नव्या आवाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला ‘ठाकरे’चा मराठी ट्रेलर

thakre
येत्या 25 जानेवारीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा मराठी ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. अभिनेता सचिन खेडेकरांचा आवाज या ट्रेलरमध्ये बाळासाहेबांना देण्यात आला होता. पण बाळासाहेबांच्या आवाजाशी मिळताजुळता हा आवाज नसल्याचे म्हणत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर हा आवाज आता अखेर बदलण्यात आला आहे.

आता नव्या आवाजासह ‘ठाकरे’ चित्रपटाचा मराठी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा आवाज नेमका कोणाचा हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा आवाज चेतन शशितल यांचा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा आवाज बाळासाहेबांच्या आवाजाशी मिळताजुळता असून हा नवा ट्रेलर पाहताना यातील संवाद साहेबांच्याच आवाजात असल्याचे वाटते.

याबद्दलची अद्याप कोणतीही घोषणा चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी केली नाही. पण राऊत यांनी प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत चित्रपटाचे पुन्हा एकदा डबिंग केले आहे, हे नक्की. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला नवाजुद्दीनचाच आवाज देण्यात आला आहे.