संभाजी महाराजांचा ‘ठाकरे’तील गाण्यात अवमान

thakre
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट येणार आहे. चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्यातील एका दृश्यावर आता संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत असलेल्या नवाजुद्दीनने या गाण्यामध्ये पायात चप्पल घालून छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केल्याचे दृश्य दाखवले आहे. सबंध महाराष्ट्रातील शिव शंभू प्रेमींच्या भावना या दृश्यामुळे दुखावल्या असल्याचे सांगत या चित्रपटाबाबत संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे दृश्य गाण्यातून वगळण्याची मागणीदेखील संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. हिंदी आणि मराठीमध्ये चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डानेही या ट्रेलरमधील काही दृश्य आणि संवादांवर आक्षेप घेतला होता. संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेवर आता राऊत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment