परदेशात नारळाच्या करवंट्यांची ऑनलाईन विक्री, किंमत तब्बल बाराशे रुपये !

naral
पुढल्या वेळी नारळाची करवंटी कचऱ्यामध्ये टाकून देण्याआधी पुन्हा विचार करा. कारण याच नारळाच्या करवंटीपासून बनविल्या गेलेल्या वस्तूंना परदेशामध्ये मोठी मागणी असून, या वस्तूंना चांगली किंमत मिळत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले असून, भारतभरातून या वृत्तावर लोकांच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया पहावयास मिळत आहेत.
coco
भारतातील प्रत्येक घरामध्ये नारळाचा वापर होतच असतो. नारळाच्या आतील खोबरे काढून घेतल्यानंतर नारळाची करवंटी अर्थातच टाकून दिली जाते. पण परदेशामध्ये नारळाच्या करवंट्या पॉलिश करून कप म्हणून वापरण्याची ट्रेंड सध्या असून, यासाठी हौशी मंडळी एका कपसाठी बाराशे रुपये देण्यास आनंदाने तयार आहेत.

नारळाची करवंटी संपूर्ण नैसर्गिक असून, त्यामुळेच यावर काही चिरा, खड्डे असणे स्वाभाविक आहे, असे या करवंटीपासून कप बनवून विकाणारी वेबसाईट म्हणते. पण हे कप बनविण्याकरिता कोणत्याही कृत्रिम पदार्थांचा वापर केला जात नसून, हा कप जास्त काळ टिकणारा असल्याचेही वेबसाईटचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच या कपसाठी इतकी जास्त किंमत मोजण्यास लोक तयार आहेत.

भारतामध्ये मात्र वीस ते पंचवीस रुपयात अख्खा नारळ मिळत असताना, केवळ करवंटीसाठी बाराशे रुपये मोजणारी मंडळी पाहून लोकांना चर्चेला आणि मनोरंजनाला नवा विषय मिळाला आहे. ट्वीटरवरही या विषयी लोकांच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. काहींनी नारळाच्या करवंट्या साठवून चक्क व्यवसाय सुरु करण्याबद्दल म्हटले आहे, तर नारळाच्या करवंटीपासून बनलेले कप वापरण्याची कल्पनाच विचित्र असल्याचे काहींचे म्हणणे आहे.