‘ठाकरे’ चित्रपटातील पहिले मराठी गाणे रिलीज

thakre
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट या चित्रपटात उलगडणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दलची चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढलेली दिसत आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. हिंदी आणि मराठी दोन्हीही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. नुकतेच या चित्रपटाच्या मराठी व्हर्जनमधील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे.

‘ठाकरे’ चित्रपटातील पहिले मराठी गाणे ‘कोण आला रे कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला’, अशी दमदार घोषणा करत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हिंदीत ‘आया रे सबका बाप रे कहते है उसको ठाकरे’ हे गाणे रिलीज करण्यात आले होते. या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळत आहे. आता ‘आपले साहेब ठाकरे’ हे गाणेही तरुणाईत गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला लाखो चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवधुत गुप्तेने या गाण्याला स्वरसाज चढवला आहे, तर हे गाणे शब्दबद्ध मंदार चोळकर यांनी केले आहे. ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी पडद्यावर उलगडणार आहेत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment