उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटला

best
मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सुटला आहे. नऊ दिवसांनी अखेर आपला संप बेस्ट कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. संप मिटल्याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात कऱण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला वेतनवाढीबाबत निर्देश दिले आहेत. सरकारला अंतिम तडजोडीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जानेवारी 2019 पासून कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचेही प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाने सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर कामगार संघटनेने तासाभरात बेस्टचा संप मिटल्याची घोषणा करावी असा आदेश दिला होता. कामगार संघटनेने वेतनवाढ यावेळी 10 ऐवजी 15 टप्प्यात हवी अशी मागणी केली होती. तसेच वाटाघाटींसाठी औद्योगिक क्षेत्राशी संबंधित त्रयस्थ व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी केली होती. त्याशिवाय बेस्ट आणि पालिका प्रशासनासोबत बोलणी यशस्वी होणार नसल्याचे मत कामगार संघटनेने व्यक्त केले होते.

उच्च न्यायालयाने मध्यस्थांच्या साथीने कर्मचाऱ्यांच्या अंतिम तडजोडीसाठी बेस्ट प्रशासनाला तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. माजी न्यायमूर्ती निषिता म्हात्रे यांच्या नावाची शिफारस कामगार संघटनेकडून चर्चेसाठी करण्यात आली आहे. दरम्यान कोणतीही कारवाई संपकरी कर्मचाऱ्यांवर करण्यात येणार नसल्याचे आश्वासन राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात देण्यात आले आहे. संप मिटल्याची अधिकृत घोषणा होताच बस पुन्हा रस्त्यावर धावण्यास सुरुवात होईल. गेले नऊ दिवस त्रास सहन केल्यानंतर आज मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment