‘अंडरवॉटर’ सागरी वस्तूसंग्रहालय लवकरच पॉन्डीचेरी येथे

ship
स्क्युबा डायव्हिंगची आवड असणाऱ्या हौशी मंडळींना लवकरच बंगालच्या उपसागराच्या आतील निरनिराळे जलचर, वनस्पती, इत्यादी सागरी वैभव पाहण्याच्या सोबतच भारतातील पहिले सागरी वस्तूसंग्रहालय पाहण्याची संधी पॉन्डीचेरी येथे लवकरच उपलब्ध होणार आहे. हे वस्तूसंग्रहालय त्या ठिकाणी बुडलेल्या एका जहाजामध्ये उभारण्यात येत आहे. पण या बुडलेल्या जहाजाचे कारण त्याला घडलेला कोणताही अपघात किंवा तत्सम प्रकार नसून, हे वस्तूसंग्रहालय बनविण्यासाठी हे जहाज मुद्दाम पाण्याखाली पाठविण्यात येत आहे.
ship1
हे जहाज ‘माईनस्वीपर’ पद्धतीचे जहाज असून, आता हे जहाज जुने झाल्यामुळे भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आले आहे. त्यानंतर भारतीय नौदलाने हे जहाज पॉन्डीचेरी येथे पर्यटनाचा विकास व्हावा आणि पर्यटकांसाठी एक नवे आकर्षण या ठिकाणी स्थापन व्हावे या उद्देशाने स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्त केले आहे. याच जहाजामध्ये भारतातील पहिले सागरी वस्तूसंग्रहालय बनविण्यात येत आहे.
ship2
पॉन्डीचेरीच्या सागरी किनाऱ्यापासून सात किलोमीटरच्या अंतरावर हे जहाज समुद्राखाली सोडण्यात येत असून, हे जहाज या ठिकाणी बुडल्याप्रमाणे पाण्याखाली उभे केले जाणार आहे. पाण्याखाली वाढणाऱ्या वनस्पती आणि शेवाळे या जहाजावर वाढावे हा त्यामागील उद्देश असल्याचे समजते. वनस्पती आणि शेवाळ्याने हे जहाज थोडेफार झाकले गेल्यानंतर हे जहाज काही वर्षापूर्वी येथे बुडाले असल्याप्रमाणे दिसू लागणार आहे. त्यानंतर स्क्युबा डायव्हिंग करून हे वस्तू संग्रहालय पहावयास येणाऱ्यांसाठी जहाजाच्या आतमध्ये शिरण्याचे आणि बाहेर पडण्याचे मार्गही निश्चित करण्यात येणार आहेत. या वस्तू संग्रहालयासोबतच सागरी संपत्ती पाहण्याचा आनंदही येथे येणाऱ्या मंडळींना घेता येणार आहे.

Leave a Comment