‘या’ जत्रेत तयार झाला सिमेंट मिक्सरमध्ये मालपुआ आणि ट्रॉलीत खीर

malpua1
मध्य प्रदेशातील एका हनुमान मंदिरात रामलीला उत्सवाची समाप्ती झाली तेव्हा वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या जत्रेत चक्क सिमेंट मिक्सरमध्ये मालपुआ तयार करण्यात आला तर ट्रॉलीत खीर शिजवण्यात आली. भाविकांच्या प्रचंड संख्येमुळे आयोजकांना हे पाऊल उचलावे लागले.

राज्यातील शिवपुरी जिल्ह्यात सतनवाडा येथे मारूतीचे मंदिर आहे.’सतनवाडा वाले, खेरे वाले’ नावाच्या या हनुमान या मंदिरात दर वर्षी 11 दिवस रामलीला उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या समाप्तीच्या वेळेस भव्य भंडारा होतो. या वर्षीही हा भंडारा रविवारी झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. विशेष म्हणजे हे मालपुआ बनविण्यासाठी नवीन सिमेंट मिक्सर यंत्र आणण्यात आले होते.
malpua
“या कार्यक्रमात हजारो लोक आले. परंपरेनुसार त्यांना मालपुआ द्यायचा होता. एवढ्या भव्य प्रमाणात मालपुआचे पीठ मळण्यासाठी सिमेंट मिक्सर वापरण्यात आला आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत खीर बनविण्यात आली,” असे हनुमान मंदिर रामलीला उत्सव आयोजन समितीचे सदस्य पंडित विकास दीप शर्मा यांनी सोमवारी सांगितले.

या भंडाऱ्यात आलेल्या सर्वांना प्रसाद मिळावा, यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत खीर बनविण्यात आली. ही ट्रॉली पूर्णपणे स्वच्छ होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात खीर बनविण्यासाठी अन्य कोणतेही भांडी छोटे पडले असते, असे पुजारी पप्पू महाराज यांनी सांगितले.

Leave a Comment