थंडीपासून संरक्षण देणारे ‘ओरोरो’ आता ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध

jacket
हिवाळ्यातील हुडहुडी भरविणारी थंडी ज्यांना मानवत नाही त्यांच्यासाठी हा ऋतू अतिशय त्रासदायक ठरू शकतो. विशेषतः अतिशय कडाक्याची थंडी ज्या प्रांतांमध्ये पडते, त्यांच्यासाठी थंडीमध्ये घराबाहेर पडून नित्यनेमाची कामे उरकणे ही तारेवरची कसरत असते. सध्याच्या काळामध्ये आतमध्ये मऊ, उबदार पॅडिंग असलेले कोट्स, डाऊन जॅकेट्स, किंवा इतर गरम कपडे बाजारामध्ये सहज उपलब्ध असले, तरी हे परिधान केल्यानंतरही काही लोकांना थंडीला तोंड देणे अवघड होऊन बसते. यावर उपाय घेऊन आली आहे ‘ओरोरो’ ही कंपनी. ही एक ‘हीटेड अपॅरल’ कंपनी आहे. म्हणजेच, या कंपनीने तयार केलेल्या कोट्स किंवा तत्सम कपड्यांमध्ये कपडे आतून गरम ठेवणारी यंत्रणा बसविलेली असते. ही यंत्रणा बॅटरीवर चालणारी असून, या बॅटरिज रिचार्ज करता येणाऱ्या आहेत.
jacket1
ओरोरो कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या गरम कपड्यांमध्ये सध्या वेस्टकोट, कोट्स, शाली, आणि स्वेटशर्टस तयार करण्यात आले असून, यामध्ये रिचार्ज करता येणाऱ्या बॅटरीवर चालणारी हिटिंग यंत्रणा बसविण्यात आली आहेत. या हिटिंग यंत्रणेच्या बॅटरिज संपूर्ण चार्ज झाल्यानंतर आठ तास चालू शकणार आहेत. तसेच कपड्याचे तापमान नियंत्रित करण्याची सोय देखील या यंत्रणेमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे हाडे गोठविणाऱ्या थंडीमध्येही तुम्हाला उबदार ठेवणारे असे हे कपडे आहेत. ओरोरो कंपनी मिडवेस्टमध्ये असून, या कंपनीतर्फे सर्व ऋतुंमध्ये वापरता येऊ शकतील असे कपडे तयार करण्यात येत आहेत. हिटिंग यंत्रणेच्या मदतीने गरम होणारे हे कपडे तीव्र थंडीमध्ये वापरता येणार आहेतच, पण त्या शिवाय हिटिंग यंत्रणेचा वापर न करताही हे कपडे जवळजवळ वर्षभर, सर्वच ऋतुंमध्ये वापरता येतील अश्या पद्धतीने बनविले गेले आहेत.
jacket2
ओरोरो कंपनीच्या वतीने तयार केल्या गेलेल्या या ‘हीटेड’ कपड्यांचे कलेक्शन www.amazon.com वर उपलब्ध करविण्यात आले असून, या सर्व कपड्यांच्या किंमती प्रत्येकी १७० डॉलर्सच्या आसपास आहेत. सध्या ओरोरोने बनविलेल्या महिलांच्या स्लिम फिट जॅकेटला बाजारामध्ये उत्तम मागणी असून, याबद्दल ग्राहकांच्या प्रतिक्रिया देखील खूपच चांगल्या असल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच कडाक्याच्या थंडीमध्ये एकावर एक असे अनेक कपडे घालण्यापेक्षा या एकाच हीटेड जॅकेटमुळे थंडीपासून बचाव होत असल्याचे समाधान ग्राहकांमध्ये पहावयास मिळत आहे.