न्यूझीलंडमध्ये आकाशात दिसलेला तेजस्वी प्रकाशकिरण नेमका कशाचा?

light
न्यूझीलंड येथील नॉर्थ आयलंडच्या तौरांगा प्रांतामध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना काही दिवसांपूर्वी आकाशामध्ये एक अभूतपूर्व दृश्य पाहण्यास मिळाले. रात्रीच्या वेळी अनेकांनी आकाशामध्ये आगीच्या प्रखर गोळ्याप्रमाणे दिसणारी एक आकृती पाहिली. हा आगीचा गोळा अतिशय वेगाने सरकत असल्यामुळे त्यातून तेजस्वी प्रकाशकिरण तयार झाला असल्याचे भासत होते. ज्यांनी हे दृश्य प्रत्यक्षामध्ये पहिले, त्यांनी याची अनेक छायाचित्रे आणि व्हिडियो घेऊन ते त्वरित सोशल मिडीयावर प्रसिद्ध केले. त्यानंतर हा प्रकाशकिरण नेमका काय असावा, यावर अनेक तर्कवितर्क सुरु झाले.

ज्या लोकांनी हा प्रकाशकिरण प्रत्यक्षात पाहिला, त्यांनी हा प्रकाशकिरण आकाशातून सरकत असताना एखादा स्फोट व्हावा असा आवाजही ऐकल्याचे म्हटले आहे. त्यानंतर या आगीच्या गोळ्याचे दोन तुकडे झाल्याचे आपण पाहिले असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. ही सर्व वर्णने ऐकून हा आगीचा गोळा आणि हा प्रकाशकिरण नेमका काय असावा याचे अनेक कयास लावण्यास नेटकऱ्यांनी सुरुवात केली आहे. काहींच्या मते ही एखादी उल्का असावी, तर हा आगीचा गोळा म्हणजे अंतराळामध्ये पाठविलेला गेलेला एखादा उपग्रह असल्याचे अनेकांचे म्हणणे पडले.

भौतिक शास्त्रज्ञ असलेले रिचर्ड इस्थर आणि ओटागो वस्तू संग्रहालयाचे प्रमुख असलेले इयान ग्रिफिन, व इतर अनेक तज्ञांच्या मतानुसार हा आगीचा गोळा एक रशियन उपग्रह असून, हा ‘अर्ली वॉर्निंग सॅटेलाईट’ असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. हा उपग्रह अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणामध्ये परतला असून, तोच सर्वांना पहावयास मिळाला असल्याचे रिचर्ड इस्थर यांनी म्हटले आहे. या उलट अनेकांनी हा प्रकाशकिरण एखाद्या उल्केचा असल्याचेही म्हटले आहे. ऑकलंड अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष बिल थॉमस यांनी हा प्रकाशाचा गोळा उल्केसमान जास्त भासत असून, हा गोळा उपग्रह असल्याची शक्यताही असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment