या सेलिब्रिटीज आहेत ‘हेल्दी कुकिंग’च्या पुरस्कर्त्या

food
आरोग्य हीच आपली धनसंपदा असल्याचे सांगत उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे राखले जावे याचे प्रत्यक्ष उदाहरण काही सेलिब्रिटीजनी आपल्या समोर ठेवले आहे. या सेलिब्रिटीज आपापल्या कलाक्षेत्रांमध्ये अतिशय दिग्गज आहेतच, पण त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्व समजल्यामुळेच आपण हे स्थान प्राप्त करू शकल्याचे यांचे म्हणणे आहे. शरीर निरोगी ठेवायचे असले, तर त्यासाठी आपण घेत असलेल्या आहार अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे जर आहार सकस, संतुलित असेल, तर शरीरही निरोगी आणि सुदृढ राहते या धोरणाचा पुरस्कार या सेलिब्रिटीज करीत असतात.
food1
१९४०च्या दशकापासून आजतागायत आपल्या मधुर आवाजाने सर्वांच्याच मनांवर राज्य करणाऱ्या आशाताई भोसले, अतिशय सुगरणही आहेत. उत्तमोत्तम पदार्थ चाखण्याची आणि ते स्वतः बनवून इतरांना आग्रहाने खाऊ घालण्याची आशाताईंची आवड सर्वांच्याच माहितीची आहे. आपली पाककलेची आवड आशाताईंनी त्यांच्या अनेक रेस्टॉरंटस् च्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली आहे. ‘चांगले गायचे असेल, तर त्यासाठी आहार सकस, पौष्टिक आणि उत्तम प्रतीचा असणे आवश्यक आहे. ज्यांना चांगले खायला आवडते, त्यांना बहुधा स्वयंपाकही उत्तमच करता येतो. ज्याप्रमाणे संगीत हे हृदयातून उमटल्यावर कानाला गोड वाटते, त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना तोही मनापासून केल्यास उत्कृष्ट होतो’ असे आशाताई म्हणतात. म्हणूनच आशाताई खास बनवीत असलेले अनेक चवदार आणि तितकेच पौष्टिक पदार्थ त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आवर्जून उपलब्ध करून दिले जातात.
food2
सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही देखील ‘हेल्दी कुकिंग’ आणि ‘हेल्दी इटिंग’ची पुरस्कर्ती असून, यावर तिने अनेक पुस्तके लिहिली आहेत. तसेच तिच्या स्वतःच्या ‘संडे बिंज’ या नावाने प्रसिद्ध केल्या गेलेल्या अनेक व्हिडियोंच्या माध्यमातून शिल्पाने अनेक पौष्टिक पदार्थ आणि ते बनविण्याची पद्धत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली आहे. युट्यूबवर हे व्हिडियो उपलब्ध असून, यामध्ये संतुलित आणि चौरस आहाराचे महत्व सांगून व्हिडियोमार्फत अनेक रेसिपीजही शिल्पाने शेअर केल्या आहेत.
food3
शिल्पाप्रमाणे अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमृता रायचंद हिने आता अभिनयासोबतच ‘मम्मी का मॅजीक’ या नावाने स्वतःचा कुकरी शो सुरु केला आहे. हा कुकरी शो टीव्हीवरील काही वाहिन्यांवर प्रसारित केला जात असतो. या शो मध्ये अमृताने लहान मुलांना आवडतील असे अनेक पदार्थ सांगितले आहेत. भाज्या, फळे, डाळी किंवा तत्सम पदार्थ आरोग्यवर्धक असले, तरी मुलांना आवडतातच असे नाही. किंबहुना सर्व प्रकारच्या भाज्या मुलांना विनाकटकट खाऊ घालणे हे त्यांच्या मातांच्या पुढले मोठे आव्हानच असते. त्यामुळे अश्या नावडत्या भाज्या आणि त्यांच्या जोडीने इतर पौष्टिक पदार्थ वापरून मुलांना नक्कीच आवडतील असे पदार्थ बनविण्यास शिकविणारा असा हा अमृता रायचंद हिचा टीव्ही शो आहे.

Leave a Comment