युएईत भारतीय कामगारांना पक्ष्यांच्या पिंजऱ्यात कोंडले

UAE
नवी दिल्ली – युएईकडून २-० च्या फरकाने अबुधाबीमध्ये सुरु असलेल्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागल्यानंतर आपल्या भारतीय कामगारांना युएईमधील एका मालकाने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मालकाने युएई विरुद्ध भारत सामन्यात, भारतीय संघाला पाठींबा दिला म्हणून चक्क आपल्या कामगारांना पक्ष्यांच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवल्याचे समोर आले आहे.

मालक या व्हिडीओमध्ये आपल्या कामगारांना तुम्ही कोणाला पाठींबा देता असा प्रश्न विचारताना दाखवला आहे. भारत असे उत्तर कामगारांनी दिल्यानंतर, आपल्या हातातील छडी उगारुन, मालक हे चुकीचं आहे…आता तुम्ही युएईमध्ये असल्यामुळे युएईला तुम्ही पाठींबा देणे गरजेचे आहे. युएईला यानंतर पाठींबा देणार असे कबूल केल्यानंतरच या कामगारांची मालकाने सुटका केली. यासंदर्भातील वृत्त खलीज टाईम्सने दिले आहे.


सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, याची युएईच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. कामगारांना पिंजऱ्यात कोंडणाऱ्या मालकाविरोधात वॉरंट जाहीर करण्यात आले असून त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. युएई सरकार या प्रकाराचे अजिबात समर्थन करत नसून योग्य ती कारवाई या मालकावर केली जाईल असे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.