‘राम रहीम’ पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी दोषी

ram-rahim
पंचकूला – आज विशेष सीबीआय न्यायालयाने पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात बाबा राम रहीम दोषी असल्याचा निर्णय सुनावला आहे. त्याला १७ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंजाब आणि हरियाणा पोलिसांनी या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राम रहीमला न्यायालयासमोर आणले जाणार आहे.

साध्वीच्या लैंगिक शोषण प्रकरणी सध्या राम रहीम रोहतक येथील सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे. पंचकूला येथे हिंसाचार उसळू नये, यासाठी सरकार आणि प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था तीव्र केली आहे. पंचकूला, रोहतक, सिरसामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, सुनारिया कारागृहाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जशनदीप रंधावा यांनी कारागृहाजवळ ४ पोलीस चौक्या लावल्या आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी कडक करण्यात येत आहे.

याआधी न्यायालयापुढे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहीम याला सादर करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तुरुंगापासून न्यायालयापर्यंत राम रहीमला नेण्यात डेरा समर्थकांमुळे मोठ्या अडचणी येण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडे यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्गाचा अवलंब करण्यात आला. यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला. डेरा सच्चा सौदा, सुनारिया जेल आणि विशेष न्यायालय येथील सुरक्षेत वाढ केली असून येथील स्थिती तणावपूर्ण आहे.

मागील आठवड्यात १६ वर्षांपूर्वी झालेल्या पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणात आज मोठा निकाल येण्याची शक्यता होती. साध्वीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात गुरमीत सिंह राम रहीमला शिक्षा सुनावणारे न्यायमूर्ती जगदीप सिंह यांनीच याही प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवले आहे. पंजाबातील माळवा प्रदेशातील ८ जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांच्या २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, भटिंडा आणि मानसा जिल्ह्यात सुमार १५ तुकड्यांमध्ये १२०० जवान तैनात केले आहेत. हे दोन्ही जिल्हे अतिसंवदेनशील मानले जातात. याशिवाय फिरोजपूर, फरीदकोट, मोगा आणि फाजिल्कामध्ये १० तुकड्यांमध्ये ७०० जवान तैनात केले आहेत.

Leave a Comment