राणी एलिझाबेथ गेली पन्नास वर्षे वापरत आहेत ‘ही’ वस्तू

Queen-Elizabeth
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्याकडे संपत्तीची, सुख-सुविधांची काहीच कमतरता नाही. पण तरीही राणी एलिझाबेथ या वैयक्तिक खर्चाच्या बाबतीत अतिशय काटकसरी असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर परिवारातील इतर सदस्यांनीही वायफळ खर्च केलेले त्यांना फारसे रुचत नसल्याचे समजते. खासगी वापरासाठी असलेल्या वस्तूंवर जास्त खर्च न करता त्या व्यवस्थित वापरल्या तर वर्षानुवर्षे चांगल्या राहतात या राणीच्या धोरणावर अंमल करणारे एक उदाहरण नुकतेच पहावयास मिळाले. राणी एलिझाबेथची आवडती ‘लाऊनर’ हँडबॅग, राणी जवळजवळ गेली पन्नास वर्षे वापरत आहेत.

View this post on Instagram

Credits: Daily Mail

A post shared by Queen Elizabeth II (@queen_elizabeth_fanpage) on


ही हँडबॅग राणीची अत्यंत आवडती असून, सर्व लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी जाताना राणीच्या बरोबर ही हँडबॅग आवर्जून पाहिली जाते. औपचारिक स्वागत समारंभ असोत, राजनैतिक बैठकी असोत किंवा खासगी कार्यक्रम असोत, राणी एलिझाबेथ तिच्या खास आवडत्या हँडबॅगविना बाहेर पडत नाही. उत्तम प्रतीच्या बॅग्ज बनविणाऱ्या ‘लाऊनर’ या ब्रँडला राणी एलिझाबेथने १९६८ साली ‘रॉयल वॉरंट’ दिले होते. हे एक प्रकारचे प्रशस्ती पत्रक असून, या ब्रँडच्या वतीने खास शाही परिवारासाठी वस्तू बनविल्या जाण्याबद्दल हे प्रशस्तीपत्रक राणीच्या वतीने दिले जात असते. ‘लाऊनर’ या ब्रँडसाठी ही हँडबॅग ‘रेनर’ कंपनीने बनविली असून, राणी एलिझाबेथ वापरीत असलेले खास चामड्याचे शूज बनविण्याचे रॉयल वॉरंट ‘रेनर’ला मिळालेले आहे.