तुम्ही पाहिली आहे का उबेरची उडणारी टॅक्सी ?

Flying-Car
उबेरची पहिलीवहिली फ्लाईंग कार ‘बेल नेक्सस’ या नावाने तयार करण्यात आली असून, या हायब्रीड इलेक्ट्रिक फ्लाइंग कारचे ‘कन्सेप्ट मॉडेल’ नुकतेच ‘सीईएस’च्या वतीने यंदाच्या वर्षी अमेरिकेतील लास व्हेगास येथे आयोजित केल्या गेलेल्या प्रदर्शनामध्ये पाहण्यास मिळाले. उबेर आणि बेल एरोस्पेस यांनी एकत्रितपणे या ‘नेक्सस VTOL एअरक्राफ्ट’चा वापर उबेरतर्फे एअर टॅक्सीसेवा पुरविण्याच्या दृष्टीने करण्याचे योजले आहे.
Flying-Car2
बेल नेक्सस हे दिसायला एखाद्या विशालकाय ड्रोन प्रमाणे असले, तरी एखाद्या ड्रोनच्या मानाने किती तरी अधिक खासियती यामध्ये आहेत. ६,५०० पाउंड वजन असलेल्या या विमानाला एकूण सहा ‘आर्टीक्युलेटेड डक्ट फॅन्स’आहेत. या पंख्यांच्या सहाय्याने हे एअरक्राफ्ट जमिनीवरून उड्डाण करून आकाशामध्ये उडू शकणार आहे आणि सहज जमिनीवर पुन्हा उतरूही शकणार आहे.

या एअर टॅक्सीची सर्वात मोठी खासियत अशी, की याला उतरण्यासाठी कोणत्याही धावपट्टीची आवश्यकता नसून, सामान्य चाळीस फुटी लँडिंग पॅडवरूनच या हवाई टॅक्सीला उड्डाण आणि लँडिंग करता येणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये मोठमोठ्या धावपट्ट्यांचे निर्माण करण्यासाठी जागांची आवश्यकता नसून, केवळ उंच इमारतींवर लँडिंग पॅडस् तयार करून ही टॅक्सीसेवा उपलब्ध करवून दिली जाणे शक्य होणार आहे. नेक्सस एअरक्राफ्ट चालाविण्यासाठी हायब्रीड इलेक्ट्रिक पावर वापरण्यात येणार असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. ही एअरक्राफ्ट सामान्य हेलिकॉप्टरच्या मानाने खूपच कमी आवाज करणारी आहेत.
Flying-Car1
एका नेक्ससमधून चार प्रवासी आणि एक वैमानिक प्रवास करू शकणार असून, दीडशे मैलांचा पल्ला ही टॅक्सी एका तासाच्या अवधीमध्ये पार करू शकणार आहे. सीईएसने आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेला प्रोटोटाईप सध्या चालविता येण्यासारखा नसून, या एअरक्राफ्टचे फ्लाईट टेस्टिंग २०२३ सालापर्यंत सुरु होणे अपेक्षित असल्याचे बेल एरोस्पेसच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Leave a Comment