11 वर्षांनंतर स्क्रीन शेअर करणार ऐश्वर्या, अमिताभ

aishwarya-and-amitabh
तब्बल अकरा वर्षांच्या कालावधीनंतर अमिताभ आणि ऐश्वर्या हे बच्चन कुटुंबीय सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणीरत्नम यांच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे वृत्त आहे. जानेवारीच्या चौदा तारखेच्या दिवशी पोंगल सणाच्या निमित्ताने या चित्रपटाविषयी घोषणा केली जाणे अपेक्षित आहे. ‘डीएनए’ मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार ऐश्वर्याने या चित्रपटासाठी मंजुरी दिली असून अमिताभ बच्चन यांनी अजून हा चित्रपट साईन करणे बाकी आहे. मोठा बजेट असणारा हा चित्रपट असून,’बाहुबली’ प्रमाणेच काल्पनिक, प्राचीन इतिहासावर आधारित याचे कथानक असणार आहे. हा चित्रपट दोन भाषांमध्ये बनविण्यात येणार असून, ऐश्वर्या आणि अमिताभ बरोबरच दक्षिणेकडील अनेक सुप्रसिद्ध अभिनेते या चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे समजते.

कलकी कृष्णमूर्ती यांच्या ‘पोन्नियीन सेल्वन'(पोन्नीचा पुत्र) या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे कथानक असणार आहे. दहाव्या आणि अकराव्या शतकातील चोला साम्राज्याचे वंशज राजराजा चोला (प्रथम) यांच्यावर ही कादंबरी आधारित आहे. या चित्रपटामध्ये काम करीत असलेल्या अभिनेत्यांकडून काही महिन्यांच्या चित्रीकरणासाठी तारखा आरक्षित करण्याचे काम सुरु झाले असून निरनिरळ्या भागांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याचे समजते. पोन्नियीन सेल्वन ही कादंबरी पाच भागांची असून, या चित्रपटाचे कथानक तीन भागांमध्ये सादर करण्यात येणार आहे, त्यामुळेच याचे चित्रीकरण पूर्ण होण्यास काही महिन्यांचा नाही, तर काही वर्षांचा अवधी लागणार आहे.

अलीकडच्या काळामध्ये अनुराग कश्यप दिग्दर्शित ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या ‘गुलाब जामून’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु व्हायचे होते. पण या चित्रपटाविषयी कोणतेच वृत्त सध्या नसल्याने, हा चित्रपट रद्द करण्यात आल्याचा कयासही लावला जात आहे. मात्र अभिनेते किंवा दिग्दर्शकांनी या वृत्ताविषयी कोणताही दुजोरा दिलेला नाही. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या या पूर्वी २००८ साली ‘सरकार राज’ मध्ये एकत्र दिसले होते. तसेच ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘कजरा रे’ गीतामध्ये बच्चन कुटुंबीय एकत्र दिसले होते.

Leave a Comment