सुप्रसिद्ध भयकथा लेखक रस्किन बॉंड यांच्या कथांवर आधारित वेब सीरिज लवकरच

bond
सुप्रसिद्ध, अव्वल दर्जाचे लेखक म्हणून ओळखले जाणारे थरारकथा आणि भयकथा लेखक रस्किन बॉंड यांच्या कथांना आता लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्म मिळत आहे. बॉंड यांच्या कथांवर आधारित वेब सीरिज लवकरच येत असून, या वेब सीरिजचे नाव ‘परछाई’ आहे. ही विशेष वेब सीरिज ‘झी ५’ वाहिनीवर पाहता येणार असून, या मालिकेमध्ये रस्किन बॉंड यांच्या बारा कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. या वेबसीरिजचा पहिला भाग पंधरा जानेवारीला प्रसारित केला जाणार आहे. या मालिकेचे पहिले चार भाग वी के प्रकाश आणि अनिरुद्ध रॉय चौधुरी यांनी दिग्दर्शित केले असून, ‘द घोस्ट इन द गार्डन अँड विंड ऑन द हॉन्टेड हिल’ व ‘ विल्सन ब्रिज अँड द ओव्हरकोट’ या कथांवर आधारित असणार आहेत. तसेच या मालिकेचे अन्य भाग जून महिन्यापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
bond1
रस्किन बॉंड भारतीय लेखक असले, तरी यांचे बहुतेक सर्वच लेखन इंग्रजी भाषेतील आहे. त्याच्या लघुकथासंग्रहाला १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच बालसाहित्यामध्ये दिलेल्या अमूल्य योगदानामुळे रस्किन बॉंड यांना १९९९ साली पद्मश्री देऊन सम्मानित करण्यात आले. बॉंड यांनी सतराव्या वर्षी लेखनाला सुरुवात केली असून, त्यांनी त्यावेळी त्यांची पहिली कादंबरी ‘ रूम ऑन द रूफ’ लिहिली होती. या कादंबरीला खूप लोकप्रियता लाभली असून, त्यासाठी १९५७ साली रस्किन यांना जॉन लिवेलीन राईस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. रस्किन बॉंड यांच्याच अतिशय गाजलेल्या ‘सुसॅनाज् सेव्हन हजबंडस् ‘ या कादंबरीवर आधारित ‘सात खून माफ’ या चित्रपटाची कथा आधारित असून, या चित्रपटामध्ये सुसॅनाची भूमिका अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केली होती. या चित्रपटालाही अमाप लोकप्रियता लाभली होती.