बंगालचे थंडीच्या मोसमातील सुपर फूड-नोलेन गुर

nolen-gul
बंगालमध्ये खास थंडीच्या मोसामामध्ये बनविले जाणारा हा गूळ चविष्ट तर आहेच, पण हा गूळ घालून बनविलेली मिष्टान्ने खाल्ल्याने वजन वाढत नसून, उलट घटण्यास मदत होते. ‘नोलेन गुर’ हा खास गूळ पचनशक्ती सुधारणारा ही आहे. खजुराच्या झाडातून काढल्या जाणाऱ्या चिकापासून तयार केले जाणरा नोलेन गुर खरेतर केवळ मिष्टान्ने बनविण्यासाठी वापरला जात नसून, आपल्या आहारामध्ये अवश्य समाविष्ट केले जावे असे हे पोषक सुपर फुडही आहे.
nolen-gu1l
या पदार्थामध्ये क्षार आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असून, या तत्वांमुळे वजनावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होते. नोलेन गुर बनविण्याची प्रक्रिया मोठी रोचक आहे. नोलेन गुर बनविण्यासाठी सर्वप्रथम खजुराच्या झाडाच्या फांद्यांखाली असणाऱ्या झाडाच्या बुंध्याला चिरा देऊन त्याखाली एक मडके टांगले जाते आणि बुंध्यातून गळणारा चीक या मडक्यामध्ये गोळा केला जातो. ही भांडे संपूर्ण दिवसभर टांगून ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी हे भांडे खाली उतरवून घेतले जाऊन यातील चीक दुसऱ्या भांड्यांमध्ये ओतून घेतला जातो. त्यानंतर हा चीक गुळ बनविण्यासाठी पाठविला जातो. हा चीक काढण्याची प्रक्रिया केवळ थंडीच्या मोसमातच केली जाते.
nolen-gu2l
हा गूळ बनविण्यासाठी पाठविला जाणारा चीक त्वरित गूळ बनविण्याच्या कामी घ्यावा लागतो. असे न केल्यास हा चीक आंबट होतो आणि मग त्यापासून गूळ तयार करणे अशक्य होते. चिकापासून गूळ तयार करण्याची प्रक्रिया ही वेळ घेणारी आणि अतिशय काळजीपूर्वक पार पाडावी लागणारी असते. चीक मोठमोठ्या मातीच्या भांड्यांमध्ये घालून तो आटवला जातो. हा चीक किती आणि कसा आटवायाचा हे बरोबर ओळखणे देखील कौशल्य आहे. चीक प्रमाणाबाहेर जास्त आटला, तर तो कडू होतो. त्यामुळे चीक योग्य प्रमाणामध्ये आटवून त्यापासून गूळ तयार करणे हे खरे कसब आहे. चीक आटवून तयार केलेल्या गुळाला नोलेन गुर म्हटले जाते. नोलेन गुरचा वापर अनेक बंगाली मिठायांमध्ये होताना पहावयास मिळतो. मिष्टी दोई आणि संदेश सारख्या लोकप्रिय बंगाली मिठायांमध्ये हा नोलेन गुर वापरला जात असतो.