नवी दिल्लीतील एम्स इस्पितळामध्ये लवकरच रोबोट करणार फिजियोथेरपी

aiims
नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या नामांकित इस्पितळातील फिजोयोथेरपी विभागामध्ये रुग्णांना आता लवकरच रोबोट फिजियोथेरपी देऊ शकणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर किंवा तत्सम काही कारणांनी फिजियोथेरपीची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना ही थेरपी देण्यासाठी एम्समध्ये लवकरच नवे तंत्रज्ञान येत असल्याची घोषणा नुकतीच, सातव्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ फिजिकल थेरपीच्या समारोप सोहळ्याच्या दरम्यान करण्यात आली.
aims1
या कॉन्फरन्समध्ये भारतभरातील आणि इतर देशांमधील एकूण ६०० लोक सहभागी झाले असून, ही कॉन्फरन्स दोन दिवस चालली. भारतामध्ये फिजियोथेरपी देणाऱ्या तज्ञांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत असून, जर यामध्ये रोबोट्सचे सहकार्य घेतले गेले तर हे काम अधिक जलद आणि तितक्याच कौशल्याने होऊ शकणार असल्याचे इस्पितळाच्या प्रतिनिधींच्या वतीने सांगण्यात आले. या रोबोट्सची सेवा अतिदक्षता विभागामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून, ज्या रुग्णांना पाठीच्या मणक्याला इजा झालेली असेल, किंवा ज्या रुग्णांना नुकताच स्ट्रोक येऊन गेला असेल, किंवा इतर ओर्थोपेडिक व न्युरोलोजिकल समस्या असतील त्यांना या रोबोटिक फिजियोथेरपीचा विशेष लाभ होणार असल्याचे म्हटले जात आहे.
aiims2
पाश्चात्य देशांमध्ये रोबोटिक्सचे तंत्रज्ञान पुष्कळ विकसित असून, अनेक कारखान्यांपासून हॉटेल्सपर्यंत सर्वच ठीकाणी रोबोट्सची सहायता घेतली जात आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामध्येही रोबोट्सचा सहभाग वाढताना पहावयास मिळू लागला आहे. भारतामध्ये एम्स हे फिजियोथेरपीसाठी रोबोट्सची सहायता घेणारे पहिलेच इस्पितळ ठरणार असून, रोबोट्स ची सहायता वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोलाची ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.