एलजी घेऊन येत आहे अदभुत ‘रोलेबल टीव्ही’, जाणून घेऊ या खासियती

LG
एल जी ची अभूतपूर्व ‘रोलेबल ओलेड टीव्ही’ची संकल्पना काही काळापूर्वीच प्रसिद्ध झाली असली, तरी आता हा टीव्ही यंदाच्या वर्षीच्या उत्तरार्धात ग्राहकांच्या भेटीला येत आहे. हा ओलेड टीव्ही त्याच्या कंटेनर बॉक्समध्ये अश्या कौशल्याने बसविण्यात आला आहे, की यामध्ये टीव्ही आहे हे सहजासहजी पाहणाऱ्याच्या लक्षात येत नाही. दिसायला हा कंटेनर बॉक्स एखाद्या टेबल प्रमाणे दिसत असून, याच्या आतमध्ये पासष्ट इंची ओलेड टीव्ही आहे. जेव्हा टीव्ही पाहावयाचा असेल, तेव्हा रिमोटवरील एका बटणाच्या सहाय्याने हा टीव्ही कंटेनर बॉक्सच्या बाहेर येत असून, टीव्ही बंद करायचा असल्यास बटणाच्या सहाय्याने तो परत कंटेनर बॉक्समध्ये पाठविता येतो.

या टीव्हीच्या कंटेनर बॉक्स खाली एक स्टँडही देण्यात आला असून या कंटेनर बॉक्समधेच टीव्हीचे स्पीकर्सही आहेत. त्याशिवाय पासष्ट इंची ओलेड टीव्हीही या कंटेनर बॉक्समध्ये आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ओलेड टीव्हीचे तंत्रज्ञान अतिशय विकसित समजले जाते. कंटेनर बॉक्समधून टीव्ही संपूर्ण बाहेर येण्यास काही क्षणांचाच अवधी लागतो. तसेच या टीव्हीचा ३/४ भाग बॉक्समध्ये जाऊन उरलेल्या स्क्रीनवर काही अॅप्स दर्शिविली जातात. या अॅप्सचा वापर छायाचित्रे घेणे, आणि तत्सम कामांसाठी केला जाऊ शकतो. या टीव्हीची शंभर वॉटस् ची ‘डॉल्बी अॅटमॉस’ साऊंड सिस्टम या टीव्हीची आणखी एक मोठी खासियत आहे. त्यामुळे जर केवळ मधुर संगीताचा आनंद घ्यायचा असेल, तर टीव्ही स्क्रीन कंटेनर बॉक्समधून बाहेर न काढतादेखील संगीताचा आनंद घेतला जाऊ शकतो.
LG1
या ओलेड टीव्ही साठी वापरण्यात आलेले ‘रोलेबल’ तंत्रज्ञान कंपनीच्या वतीने सुमारे पन्नास हजार वेळा तपासले गेले असल्याने या तंत्रज्ञानामध्ये आलेल्या अडचणींचे पूर्णपणे निवारण केले गेले असल्याचे एल जी च्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिवसातून चार वेळा जरी हा टीव्ही कंटेनर बॉक्समधून ‘रोल आउट’ आणि ‘रोल इन’ केला गेला तरी त्या हिशोबाने पुढील छत्तीस वर्षे तरी या तंत्रज्ञानामध्ये कोणताही बिघाड होणे शक्य नसल्याची ग्वाही कंपनीने दिली आहे. पण वास्तविक हा टीव्ही बाजारामध्ये आल्यानंतरच या टीव्हीचे ‘रोलेबल’ तंत्रज्ञान, कंपनीने दिलेल्या आश्वासनांवर खरे उतरते किंवा नाही हे ठरू शकेल.

Leave a Comment