दहा जानेवारीपासून सुरु होणार ओपन एसएससी बोर्ड

vinod-tawade
मुंबई – राज्याचे शिक्षण विभाग शारीरिक अक्षमतेमुळे शाळेत जाऊ न शकणारे अपंग विद्यार्थी व कला, क्रीडा क्षेत्रांत पुढील शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यांच्यासाठी राज्य मुक्त मंडळ (ओपन एसएससी बोर्ड) स्थापन करणार आहे. दहा जानेवारीपासून या मंडळाचे कामकाज सुरू होणार असून, लिंकही सुरू करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेलेल्या आणि शारीरिक अक्षमतेमुळे शाळेत जाऊ न शकणारे अपंग विद्यार्थी, तसेच क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेताना त्याच दिवशी आलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचण येते. शिक्षण विभागाने अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ओपन एसएससी बोर्ड स्थापन केले आहे. विद्यार्थ्यांना त्याद्वारे स्पर्धा अथवा कार्यक्रम सांभाळून शिक्षण पूर्ण करता येईल. डिसेंबर आणि जून महिन्यांत विद्यार्थ्यांना या मंडळामार्फत थेट दहावीची परीक्षा देता येईल. मुक्‍त मंडळातर्फे या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.

वयाची १० वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचवीची परीक्षा देता येईल. त्याचप्रमाणे १३ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवीची आणि १५ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीची परीक्षा देऊ शकतील. मुक्त शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र आणि राज्य एसएससी बोर्डाचे प्रमाणपत्र समकक्ष असेल.

Leave a Comment