भविष्यात इंग्लंडची राणी म्हणून कशी असेल कॅमिला पार्कर बोल्स?

camila-parker
ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स आणि दीर्घकाळ त्यांची प्रेयसी असलेली कॅमिला पार्कर बोल्स यांनी २००५ साली विवाह केला खरा, पण तेव्हापासून कॅमिला भविष्यामध्ये इंग्लंडची राणी म्हणून कशी असेल यावर चर्चा सुरु झाली, ती आजतागायत कायम आहे. प्रिन्स चार्ल्सची पहिली पत्नी डायना ही ब्रिटनमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याने, तिच्या ठिकाणी राणी म्हणून कॅमिलाला पाहण्याची कल्पना सुरुवातीला ब्रिटीश जनतेला पचणारी नसली, तर आता मात्र जनमत हळूहळू बदलताना दिसत आहे. त्यामुळे राणी एलिझाबेथच्या मृत्युनंतर जेव्हा प्रिन्स चार्ल्स राजे बनतील तेव्हा कॅमिलाला राणी म्हणून पाहण्यासाठी आता ब्रिटीश जनतेची फारशी हरकत दिसत नाही.
camila-parker1
चार्ल्स आणि कॅमिलाच्या प्रेमप्रकरणामुळे चार्ल्स आणि डायनाच्या संपुष्टात आलेल्या विवाहसंबंधामुळे कॅमिलाला ब्रिटीश जनतेचा रोष पत्करावा लागला होता. कॅमिला आणि चार्ल्स विवाहबद्ध झाल्यानंतरही जनमत सुरुवातीला कॅमिलाच्या विरुद्धच होते. मात्र गेली काही वर्षे ब्रिटीश जनतेचे कॅमिलाबद्दल मत बदलले असून, कॅमिला ही एक उत्तम राणी ठरेल असे मत आता पहावयास मिळत आहे. कॅमिला चार्ल्सना सर्वतोपरी मदत करणारी असून, तिच्यामुळे चार्ल्स प्रत्येक जबाबदारी आत्मविश्वासाने पेलत असल्याचे बोलले जाते.
camila-parker2
चार्ल्स आणि कॅमिलाचा विवाह झाल्यानंतर कॅमिलाने देखील राजपरिवाराच्या इतर सदस्यांप्रमाणे अनेक औपचारिक जबाबदाऱ्या उचलल्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्या कॅमिला अतिशय निष्ठेने पार पाडत असून, त्यामुळे तिची लोकप्रियता सातत्याने वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे चार्ल्स आणि कॅमिला यांच्यातील सामंजस्य चांगले असून, त्यामुळे राजनैतिक जबाबदाऱ्या पेलण्यास त्यांना फारशी अडचण होणार नसल्याचे म्हटले जाते. चार्ल्स आणि कॅमिला यांची व्यक्तिमत्वे भिन्न असली, तरी एकमेकांना पूरक आहेत. परिणामी या दोघांमध्ये मतभेद क्वचितच होत असून, एकमेकांना साथ देत सर्व जबाबदाऱ्या उचलण्याची क्षमता या दोघांमध्ये असल्याचे ही म्हटले जात आहे.

Leave a Comment