दीपक सावंत यांनी दिला आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा

deepak-sawant
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या कोटयातून दीपक सावंत मंत्री होते. ७ जुलै २०१८ रोजी डॉ. सावंत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतरही मंत्रिपदावर ते कार्यरत होते. विधिमंडळाच्या कोणत्याही मंत्र्याला सहा महिन्यांच्या कालावधीत दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येण्याचे घटनात्मक बंधन आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शिवसेनेने सावंत यांच्या जागी मंत्रिपदासाठी दुसरे नाव सुचविण्याबाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडत अयोध्येतील राम मंदिरप्रश्नी संघर्षांची भूमिका घेतली असताना एका मंत्रिपदाची अभिलाषा ठेवून नवीन नावाची शिफारस करण्यावरुन शिवसेनेत संभ्रम असून ठाकरे सोमवारी अंतिम निर्णय घेणार आहेत.

भाजप नेते युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगत असले तरी शिवसेना आक्रमक असून राम मंदिराचा प्रश्न व अन्य मुद्दय़ांवरून भाजप नेतृत्वावर सातत्याने शरसंधान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी एका नावाची शिफारस केल्यास शिवसेना सत्तेसाठी हपापलेली आहे, अशी टीका होऊ शकते व जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल.

Leave a Comment