माणिकर्णिका घाटावरील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी आकारला जातो कर

death
काशीला भगवान शिवाची नगरी म्हणण्यात येते. त्यामुळेच मोक्ष प्राप्ती व्हायची असेल, तर काशीची यात्रा करण्याला महत्व आहे. त्याचप्रमाणे एखाद्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार काशीमध्ये केले गेल्यास त्याला स्वर्गप्राप्ती होत असल्याची मान्यताही आपल्याकडे रूढ आहे. त्यामुळेच काशी येथे अनेक लोक आपल्या मृत आप्तेष्टांच्या अंत्यविधीसाठी किंवा पिंडदानासाठी आवर्जून येत असतात. मात्र काशी येथे असलेल्या माणिकर्णिका घाटावरील स्मशानभूमीमध्ये मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यापूर्वी कर आकारला जातो. ही पद्धत आताच्या काळातली नसून, शेकडो वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी सुरु आहे. अश्या प्रकारचा कर आकारला जाणारी ही एकमेव स्मशानभूमी असून, या ठिकाणी दररोज किमान तीन हजार मृतदेहांचे अंत्यविधी पार पाडले जात असतात.
death1
मणिकर्णिका घाटावरील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करविण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या कराची परंपरा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीपासूनची असल्याचे म्हटले जाते. प्राचीन काळापासून या स्मशानभूमीची देखरेख करण्याची जबाबदारी डोम जातीच्या लोकांवर असून, अंत्यविधी साठी कर आकारण्याची परंपरा राजा हरीश्चन्द्राच्या काळापासून असल्याचे म्हटले जाते. या परंपरेशी निगडीत एक आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. या आख्यायिकेनुसार, राजा हरीशचंद्राला त्याने दिलेल्या वाचनाचे पालन करण्यासाठी आपले सिंहासन सोडावे लागले. त्यामुळे राज्याच्या सोबत हरीशचंद्राने सर्व संपत्तीचा देखील त्याग केला. तश्यातच राजाच्या मुलाचा देखील अचानक मृत्यू झाला. त्या काळी देखील आप्तेष्टाचे संस्कार करण्यापूर्वी काही तरी दान देणे बंधनकारक असे. पण सर्व संपत्तीचा त्याग केलेल्या हरीशचंद्राकडे दान देण्यासाठी काहीच उरले नव्हते. तेव्हा हरिश्चंद्राने आपल्या पत्नीच्या शालूचा एक तुकडा फाडून दान म्हणून दिला आणि मुलाचा अंत्यविधी केला असल्याची ही आख्यायिका आहे.
death2
आजकालच्या काळामध्ये या दानाचे रुपांतर पैशांमध्ये झाले असून, एके काळी धनिक लोक, राजे-रजवाडे, डोम जातीच्या लोकांना दान म्हणून सोन्या-चांदीची आभूषणे, तर कधी जमिनी देखील देत असल्याचे म्हटले जाते. आजच्या काळामध्ये येथे अंत्यविधी करविण्यासाठी काही ठराविक रक्कम कर म्हणून येथे भरावी लागते. या परंपरेच्या शिवाय आणखीही काही परंपरा माणिकर्णिका घाटावर गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या आहेत. होळीच्या दिवशी चितेमधील राखेने होळी खेळण्याची परंपरा येथे रूढ असून, चैत्र नवरात्री अष्टमीला वेश्यांच्या नृत्याची परंपरा देखील येथे रूढ आहे. मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून या दिवशी खास येथे वेश्या नृत्य करीत असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment