वसंत पंचमीच्या दिवशी अवश्य करा ‘ही’ कामे

devi
माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी वसंत पंचमी दहा फेब्रुवारीला असून, हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो. या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आराधना करण्याची पद्धत आहे. ही आराधना करून याचे शुभफल प्राप्त होण्यासाठी या दिवशी करावयाची काही खास कार्ये सांगितली गेली आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून पिवळी वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर पिवळ्या आसनावर बसून सरस्वतीची पूजा करावी. पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले वापरावीत. सरस्वती स्तोत्राचे पठन करावे.

सर्व प्रकारचे ऐश्वर्य, ज्ञान, विद्या, बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले गेले आहे. याच दिवशी देवी सरस्वती प्रकट झाली असल्याची पौराणिक मान्यता आहे. ‘ॐ ह्रीं ऐं ह्रीं सरस्वत्यै नमः’ हा दिव्य मंत्र जपल्याने आणि सरस्वतीला १०८ पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ मिळत असल्याची मान्यता प्राचीन काळापासून रूढ आहे. या शिवाय या दिवशी वही, लेखणी, यांचे ही पूजन शुभ मानले गेले आहे. या पूजनामुळे स्मरण शक्ती चांगली होत असल्याचे म्हटले जाते.

सरस्वतीच्या पूजेमध्ये केशर आणि पिवळे चंदन यांचा प्रामुख्याने वापर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचा उपयोग गुरुला प्रसन्न करणारा असून, यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी चांदीच्या वाटीमध्ये दुह्सात थोडे केशर मिसळून त्याचा टिळा देवीच्या प्रतिमेला लावला जावा. या दिवशी पूजेमध्ये बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे. तसेच विद्यारंभ करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय पवित्र मानला गेला आहे.

Leave a Comment