खाऱ्या पाण्याची अलर्जी असूनही सात समुद्र पार करणारी जगज्जेती जलपरी

swimmer
समुद्राच्या पाण्यामध्ये पोहत असताना त्वचेची आग-आग होत असूनही बुला ने इंग्लिश चॅनल पोहून पार केला. खरेतर हाती घेतलेली ही कामगिरी लवकर संपवावी अशी मनोमनी कामना करीत असतानाच, अर्ध्यातूनच मागे परतावे असा विचार बुलाच्या मनाला शिवला देखील नाही. अश्या या अतिशय धाडसी आणि दृढनिश्चयी बुला चौधुरीला वास्तविक खाऱ्या पाण्याची अलर्जी आहे. पण केवळ या कारणामुळे जगभरातील सात समुद्र पोहून पार करण्याची महत्वाकांक्षा या जलपरीने सोडली नाही. पोहणे हेच आपले जीवन आहे, असे समजणारी बुला सात समुद्र पोहून पार करणारी विश्वातील पहिली जलतरणपटू ठरली.

हा विक्रम करणारी बुला आता ४८ वर्षे वयाची असली, तरी तिने पोहण्यास सुरुवात केलो, ती वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून. ज्या ठिकाणी बुला लहानपणी राहत असे, त्या घराच्या जवळच एक तळे होते. त्या तळ्यामध्ये बुलाचे वडील तिला पोहोण्यास घेऊन जात असत. बुलाचे वडील तरुण असताना पोहावयास गेले असता, अचानक बुडू लागले. सुदैवाने जवळच असलेल्या एका सज्जन माणसाने त्यांचे प्राण वाचविले. त्याच क्षणी आपल्या मुलांना पोहता आलेच पाहिजे असा मनोमन निश्चय बुलाच्या वडिलांनी केला. त्यांचीच इच्छा बुला आजवर पूर्ण करीत आली असल्याचे ती म्हणते.
swimmer1
सुरुवातीला थोडेफार पोहता यायला लागल्यानंतर बुलाने पोहोण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पश्चिम बंगालच्या एका लहानश्या गावातून आलेल्या आणि गावातल्या तळ्यामध्ये फ्रॉक घालूनच पोहण्यास शिकलेल्या बुलाला सुरुवातीला, स्मिमिंग कॉस्च्युम कसा असतो हे देखील ठाऊक नव्हते. स्विमिंग कॉस्च्युम खरेदी करण्याइतके पैसेही जवळ नसल्यामुळे बुलाच्या आईने स्वतःच हा कॉस्च्युम बनविण्याचे ठरविले. पण यासाठी कोणत्या प्रकारचे कापड लागते, ते कुठे मिळते याची कोणतीच कल्पना नसल्याने बुलाच्या आईने चक्क सुती कपड्याचाच कॉस्च्युम बुलासाठी तयार केला. पण बुलाला त्याने काहीही फरक पडला नाही, कारण तिच्या अंगी असलेली जिद्द आणि लागेल तितकी मेहनत घेण्याची तयारी या दोन गोष्टी तिला उत्तम जलतरणपटू बनविण्यासाठी पुरेश्या होत्या. बुलाचे पोहण्याचे कौशल्य तिच्या प्रशिक्षकांच्याही ध्यानी येऊ लागल्याने त्यांनीही तिच्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली.

अवघ्या बारा वर्षांची बुला एखाद्या माश्याप्रमाणे पोहू लागली होती. अगदी लहान वयातच बुलाने पोहण्यात अनेक नवे विक्रम केले. कॉमनवेल्थ स्पर्धांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बुलाने मिळविलेले यश हे तिच्या मेहनतीचे फळ होतेच, पण त्याहूनही अधिक, पोहण्यासाठी तिच्या मनामध्ये असलेली ओढ या यशाने जास्त दिसून येत होती. आता बुलाने जलतरणतलावांच्या बाहेर पडून समुद्रामध्ये पोहण्याचा घाट घालण्यास सुरुवात केली. यासाठी तिने इंग्लिश चॅनलमध्ये पोहोण्याचा सराव सुरु केला असता, या पाण्यामध्ये पोहताना बुलाच्या सर्वांगाची अतिशय आग होत असे. तेव्हा तिला समुद्राच्या खाऱ्या पाण्याची अलर्जी असल्याचे निदान वैद्यकीय तज्ञांनी केले. पण अश्या अडचणींमुळे मागे हटण्याचा विचार बुलाच्या मनाला देखील शिवला नाही. आणि अखेर १९८९ साली बुलाने इंग्लिश चॅनल यशस्वीरीत्या पोहून पार केला.
swimmer2
१९८९ साली इंग्लिश चॅनल पोहून पार केल्यानंतर दहा वर्षांनी बुलाने दुसऱ्यांदा इंग्लिश चॅनल पोहून पार केला. २००४ साली श्रीलंकेतील तलाईमन्नार पासून, ‘पॉल्क स्ट्रेट्स’ मधून पोहत भारताच्या तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत पोहण्याचा विश्वविक्रम बुलाने केला. त्यानंतर २००५ साली, जगातील पाच खंडांतील समुद्र पोहून पार करण्याचा विश्वविक्रम करणारी बुला पहिली महिला जलतरणपटू ठरली. त्याचप्रमाणे तीन तास सव्वीस मिनिटांच्या अवधीमध्ये तीस किलोमीटर पोहून जाण्याचा विक्रमही बुलाने केला. साउथ एशियन गेम्समध्ये विजेतेपद मिळविलेल्या आणि अनेक विश्वविक्रम केलेल्या बुला चौधुरीला अर्जुन पुरस्कार आणि अतिशय मानाच्या पद्मश्री सन्मानेही गौरविण्यात आले आहे.

Leave a Comment