चीनमधील या शहरामध्ये सार्वजनिक वाहनव्यवस्था लवकरच होणार शंभर टक्के ‘इलेक्ट्रिक’

bus
चीनमधील या शहराने सार्वजनिक वाहन व्यवस्थेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या बसेसचे विद्युतीकरण केले आहेच, पण आता हा ‘इको फ्रेंडली’ पर्याय सर्व टॅक्सींकरिता ही वापरण्यात येणार असून, यामुळे सार्वजनिक वाहनव्यवस्थेचे शंभर टक्के विद्युतीकरण करणारे हे जगातील पहिले वहिले शहर ठरणार आहे. चीनमधील शेंझेन या शहरातील पासष्ट टक्के टॅक्सीज् सध्या ‘इलेक्ट्रिक’ असून, २०२० सालापर्यंत हे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
bus1
सार्वजनिक बसेसचे विद्युतीकरण या पूर्वीच करण्यात आले असून, या बसेस ‘चार्ज’ करण्यासाठी शहरभरामध्ये ५१० चार्जिंग स्टेशन्स आणि आठ हजार चार्जिंग पोल्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहनव्यवस्थेचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या वाहनव्यवस्था हाताळणाऱ्या कंपन्यांना चीन सरकारच्या वतीने भरपूर आर्थिक सूट देण्यात येत असते. म्हणूनच सार्वजनिक वाहन व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.
bus2
या योजनेमुळे इलक्ट्रिक गाड्यांना चीनमध्ये मोठी मागणी असून, चीनची बाजारपेठ ही इलेक्ट्रिक वाहनांच्या करिता सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. पर्यावरणाचे रक्षण करणारी ही ‘ग्रीन’ वाहनव्यवस्था प्रदूषणाच्या महाप्रश्नाशी दोन हात करण्याचा चीन प्रशासनाचा एक प्रयत्न म्हणता येईल. चीनमधील मोठ्या शहरांमधील हवा अतिशय दूषित बनली असल्याने हे संकट दूर करण्याचे सर्व प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत.

Leave a Comment