अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले

ajay-makan
नवी दिल्ली – अवघे चार महिने लोकसभा निवडणुकीला उरले असतानाच काँग्रेसला देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्येच मोठा झटका बसला आहे. अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, तो पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेस पक्षातील अजय माकन हे मोठे नेते आहेत. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

गुरुवारी रात्री उशीरा राहुल गांधी यांची अजय माकन यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. २०१५ मधील दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर दिल्ली काँग्रेसचा प्रमुख म्हणून मला पक्षातील कार्यकर्त्यांकडून, माध्यमांकडून आणि राहुल गांधी यांच्याकडून अपार प्रेम मिळाले. सध्याच्या परिस्थितीत हे सहजसाध्य निश्चितच नव्हते. मला केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, अशा आशयाचे ट्विट अजय माकन यांनी शुक्रवारी सकाळी केले.

दिल्ली विधानसभेत पक्षाने हार पत्करल्यानंतर दिल्लीच्या अध्यक्षपदाची ५४ वर्षांचे अजय माकन यांनी जबाबदारी स्वीकारली होती. अजय माकन यांच्यानंतर या महत्त्वाच्या पदावर पक्षाकडून कोणाला नियुक्त केले जाणार, याबद्दल आता चर्चांना सुरुवात झाली आहे.

Leave a Comment