निसर्गाशी एकरूप होऊन, मन:शांती देणाऱ्या वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर ‘नवदर्शनम’ ला भेट देणे अगत्याचे आहे. तामिळनाडू राज्यातील ग्रामीण भागामध्ये १९९० साली वसविले गेलेले ‘नवदर्शनम’ हा खरोखर वेगळाच अनुभव आहे. आधुनिक जीवनपद्धती आणि विचारसरणीचा अवलंब करताना देखील पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल याचा संपूर्ण विचार या ठिकाणी पहावयास मिळतो. मूळ एका ओसाड भूभागावर वसलेल्या ‘नवदर्शनम’ची कल्पना १९९० साली अस्तित्वात आल्यानंतर, इतके वर्षांच्या अथक परिश्रमांच्या नंतर आता इथे जणू नंदनवन फुलले आहे.
नवदर्शनम या ठिकाणी आवश्यक असलेल्या विजेची पूर्तता करण्यासाठी सौरउर्जेचा वापर करण्यात येतो. तसेच येथे असलेल्या सार्वजनिक भोजनगृहामध्ये सर्व भोजन बायोगॅसचा वापर करून बनविण्यात येते. रेन वॉटर हार्व्हेस्टिंगचा उपक्रमही या ठिकाणी राबविला जात असून, पावसाचे पाणी कोणत्याही कृत्रिम साहित्यांचा (प्लास्टिक) वापर न करता, गोण्यांचा वापर करून गाळून घेऊन साठविण्यात येते. पावसाचे पाणी व्यर्थ वाहून जाणार नाही याची काळजी घेत हे पाणी वसाहतीतील तलावामध्ये जाऊन मिळेल याची खबरदारी घेण्यात आली आहे.
या वसाहतीमध्ये उभारण्यात आलेली सर्व घरे पर्यावरणाचे संतुलन राखत बनविली गेली असून, ही घरे बनविण्यासाठी उन्हामध्ये वाळविलेल्या मातीच्या विटांचा वापर करण्यात आला आहे. अन्नाची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी भाज्यांची जैविक पद्धतीने लागवड करण्यात येत असून, सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पिकविली जात असतात. या कामी स्थानिक शेतकऱ्यांची मदतही घेतली जाऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असतो. येथे पिकविली गेलेली धान्ये, फळे, भाज्या बेंगळूरू शहरामध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येऊन, शहरातील लोकांना गरजेनुसार, रास्त भावामध्ये ताजे आणि जैविक अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जात असतात.
या उपक्रमाद्वारे २५ शेतकरी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून, या उपक्रमाअंतर्गत मिळणारा सर्व आर्थिक नफा या शेतकऱ्यांना दिला जातो. असे हे नवदर्शनम, पर्यावरणाचे उत्तम संतुलन राखून बनविले गेलेले नंदनवनच म्हणावे लागेल.