नववर्षाचे स्वागत करण्याची अशीही अजब परंपरा !

coffin2
नववर्षाचे आगमन नुकतेच झाले असून, सर्वांनी आपापल्या परीने नववर्षाचे स्वागत केले आहे. नववर्षाचे स्वागत करण्याच्या परंपरा देशोदेशी निराळ्या आहेत. मात्र नववर्षाचे स्वागत करण्याची थायलंड देशातील एका बौद्ध मंदिराची परंपरा खरोखर अजब म्हणावी लागेल. थायलंड देशातील बँकॉक शहराच्या उपनगरामध्ये असलेल्या एका विशिष्ट मंदिरामध्ये ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरु आहे. नववर्षाच्या निमित्ताने या मंदिरामध्ये येऊन भाविक शवपेटिकांमध्ये निजून, स्वतःचेच अंत्यविधी करवून घेतात, अशी ही अजब परंपरा आहे. आपल्याला अतिशय विचित्र वाटणाऱ्या आणि काहीसे अस्वस्थ करणाऱ्या या सोहळ्यामध्ये, येथे येणारे थाई बौद्ध धर्मीय मात्र मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात.
coffin1
हा सोहळा मृत्यू आणि पुनर्जन्म यांचे प्रतीक असून, या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याने गत काळातील सर्व नकारात्मक भावना आणि कर्म नष्ट होत असून, नववर्षाच्या मुहूर्तावर भाग्योदय होत असल्याची भाविकांची मान्यता आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांना शवपेटिकांमध्ये निजावे लागते. शवपेटिकेमध्ये निजताना भाविक आपल्या हातांमध्ये फुले आणि उदबत्त्या घेऊन निजतात. याच वेळी बौद्ध धर्मगुरू एकीकडे मंत्रोच्चारणही करीत असतात. या नंतर शवपेटिकेमध्ये निजलेल्या भाविकांच्या अंगावर गुलाबी रंगाचे आच्छादन पांघरले जाऊन, मरण पावलेल्या लोकांसाठी म्हणावयाची प्रार्थना या वेळी म्हटली जाते.
coffin
शवपेटिकेमधे निजणे, हे आपली दु:खे, आपल्या अडचणी आपल्या शरीरातून आणि मनातून काढून टाकण्याचे प्रतीक असून, विधी पार पडल्यानंतर शवपेटिकेतून बाहेर येणे हे नव्या शुभारंभाचे प्रतीक असल्याचे भाविक मानतात. ज्या मंदिरामध्ये हा सोहळा पार पाडला जातो त्या मंदिराचे नाव ‘ताकीन टेम्पल’ असून, दर वर्षी हजारोंच्या संख्येने भाविक या मंदिरामध्ये नववर्षानिमित्त आयोजित या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येत असतात.

Leave a Comment