केप्लर टेलिस्कोपच्या मदतीने शास्त्रज्ञांनी शोधले शंभराहूनही अधिक ‘एक्सो प्लॅनेट्स’

keplar
नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपच्या व त्याचा जोडीने ऑब्झर्व्हेटरीच्या माध्यमातून मिळालेल्या डेटाच्या मदतीने शास्त्रज्ञांना शंभराहूनही अधिक ‘एक्सो-प्लॅनेट्स’ शोधण्यात यश आले आहे. या नव्या शोधामुळे एक्सो-प्लॅनेट्स आणि पर्यायाने अंतराळविश्वाबद्दल आणखी महत्वपूर्ण माहिती मिळणे शक्य होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सूर्याखेरीज इतर ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांना विज्ञानाच्या भाषेमध्ये ‘एक्सो प्लॅनेट्स’ म्हटले गेले आहे. या ग्रहांबद्दल अधिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न, वैज्ञानिक गेल्या अनेक दशकांपासून करीत आहेत.
keplar1
ही माहिती मिळविण्याच्या कामी केप्लर स्पेस टेलिस्कोपची मोठी मदत झाली आहे. हा टेलिस्कोप २००९ साली लॉन्च करण्यात आला होता. खास एक्सो प्लॅनेट्स शोधण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी हा टेलिस्कोप बसविण्यात आला होता. जर एखादा ग्रह, तो प्रदक्षिणा घालत असलेल्या ताऱ्याच्या समोरून गेला, तर तितक्या वेळापुरता त्या ताऱ्याचा प्रकाश अंधुक होत असतो. केप्लर टेलिस्कोपच्या मार्फत या प्रक्रियेचे निरीक्षण करता येणे शक्य असून, याच गोष्टीचे निरीक्षण करून सूर्याच्या खेरीज इतर ताऱ्यांच्या भोवतीही काही ग्रह फिरत असल्याचे निदान करता येणे शास्त्रज्ञांना शक्य झाले.
keplar2
पण ताऱ्यांचा तात्पुरता अंधुकपणा इतर काही कारणांच्या मुळेही असू शकतो. त्यामुळे ताऱ्यांच्या प्रकाशामध्ये येणारा अंधुकपणा हा एखादा ग्रह त्याच्यासमोरून गेल्यानेच आला आहे याचे पक्के निदान होणे महत्वाच असते. याच कामी केप्लर टेलिस्कोप महत्वपूर्ण भूमिका बजावतो. केप्लर टेलिस्कोपमध्ये २०१३ साली काही तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ‘के-२’ या मिशन मार्फत वैज्ञानिकांनी एक्सो प्लॅनेट्सचा शोध घेण्याचे काम सुरु ठेवले होते. के-२ ने पाठविलेल्या डेटाच्या माध्यमातून जगभरातील वैज्ञानिकांना तब्बल १०२ एक्सो प्लॅनेट्सचा यशस्वी शोध लावता येणे शक्य झाले. आता औपचारिक रित्या नासाने केप्लर टेलिस्कोपला निरोप दिला असून, त्याच्या जागी आलेल्या ‘टेस’ स्पेस टेलिस्कोपने आवश्यक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.