पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध करण्यासाठी दक्षिण कोरियातील महिलांचा अनोखा उपाय

korea
स्त्री सुंदरच दिसायला हवी, आणि त्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी समजूत दक्षिण कोरियामध्ये प्रामुख्याने दिसून येते. आणि म्हणूनच दक्षिण कोरियन स्त्रिया स्वतःच्या सौंदर्यासाठी तासच्या तास खर्च करीत असतात. त्यातून दक्षिण कोरियातील संस्कृती पुरुषप्रधान असून, स्त्रिया केवळ सौंदर्याची प्रतिमा म्हणून पाहिल्या जातात. म्हणूनच या देशामध्ये सौंदर्याची परिभाषा वेगळी आहे. स्त्री किती चतुर, बुद्धिमान, कर्तृत्ववान आहे, यापेक्षा देखील ती किती सुंदर दिसते याला या देशामध्ये जास्त महत्व दिले जाते. तसेच या देशामध्ये पुरुषांच्या मानाने स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. इतकेच नव्हे तर एखादी स्त्री चष्मा लावत असेल, तर ते ही कुरूपतेचे प्रतीक समजले जाते.
korea1
या पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध दर्शविण्यासाठी आता दक्षिण कोरियन महिलांनी एक अनोखा उपाय अवलंबला आहे. आता पुरुषांनी केवळ बाह्यरूपाचे सौंदर्य पाहून स्त्रीची परीक्षा न करता, तिला तिच्या गुणांसाठी ओळखावे या उद्देशाने दक्षिण कोरियन महिलांनी सुंदर दिसण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे वारे देशभरामध्ये झपाट्याने पसरताना पहावयास मिळत असून, या निर्णयाचे सूचक म्हणून कोरियन महिला आपल्या मेकअप साठी वापरली जाणारी प्रसाधने नष्ट करताना पहावयास मिळत आहेत. या मोहिमेला ‘एस्केप द कोर्सेट’ या नावाने ओळखले जात आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांचा बांधा अतिशय आखीव भासविण्यासाठी ‘कोर्सेट’ परिधान करण्याची पद्धत असे. हे परिधान घालणे अतिशय त्रासदायक असून, अगदी श्वास घेणेही कठीण व्हावे अश्या पद्धतीने हे कोर्सेट महिलांच्या पोटाभोवती, कंबरेभोवती आवळले जात असे. आजच्या काळामध्ये केवळ फॅशन म्हणून कोर्सेट वापरले जात असले, तरी एके काळी हे परिधान करणे बंधनकारक असे.
korea2
सौंदर्याची परिभाषा बदलली जावी आणि स्त्री केवळ तिच्या बाह्यरूपावरून ओळखली न जाता तिच्या गुणांनी ओळखली जावी या करिता दक्षिण कोरियन स्त्रियांनी सुंदर दिसण्या साठी मेकअप करणे त्यागले आहे. सुंदर दिसणे कोरियामध्ये अतिशय महत्वाचे समजाले जात असून यासाठी सर्वसामान्यपणे स्त्रिया दोन ते तीन तासांचा अवधी दररोज त्वचा, केस आणि प्रसाधन यांसाठी खर्च करीत असतात. ही देखील एक प्रकारची गुलामगिरी आहे असे या स्त्रियांचे म्हणणे असून, यासाठी सौंदर्यप्रसाधनांचा त्याग स्त्रियांनी केला आहे, तर अनेक स्त्रियांनी या मोहिमेला समर्थन देत आपले लांबसडक केस कापून आखूड करून घेतले आहेत.

Leave a Comment