१९७ दिवस अंतराळामध्ये राहून पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराला चालणे झाले मुश्कील

astronut
एका ‘फील्ड टेस्ट’ प्रयोगाच्या निमित्ताने अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये तब्बल १९७ दिवस राहिलेला ए जे (ड्र्यू) फ्युस्टेल हा अंतराळवीर जेव्हा आपली मिशन पूर्ण करून पृथ्वीवर परतला, तेव्हा त्याला चालता येणेही मुश्कील होऊन बसले. अंतराळामध्ये इतका जास्त काळ राहिलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर चालण्यासारखी साधी क्रिया देखील अवघड वाटू लागते. ड्र्यू फ्युस्टेल पृथ्वीवर परतल्यानंतर येथील गुरुत्वाकर्षणाचा भार शरीरावर सहन करून चालता येणे त्याला कठीण जात असून, चालण्याचा प्रयत्न करीत असतानाचा त्याचा व्हिडियो त्याने नुकताच शेअर केला आहे.
astronut1
या व्हिडियोचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी करण्यात आले असून, केवळ थोडेसे अंतर चालून जाण्यासाठी देखील खूपच त्रास सहन करावा लागणारा फ्युस्टेल पहावयास मिळत आहे. नासाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये, मिशन ‘५६’ चा कमांडर असलेला फ्युस्टेल आणि त्याचा सहायक अभियंता रिकी आर्नोल्ड यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर सहावा ‘स्पेसवॉक’ यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, ते नुकतेच पृथ्वीवर परतले आहेत. अंतराळामध्ये पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसल्याने जमिनीवर न चालता अंतराळवीर केवळ हवेमध्ये तरंगत असतात. अश्या अवस्थेमध्ये तब्बल १९७ दिवस घालविल्यानंतर हे अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. अश्या वेळी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा भार सहन करून चालायला सुरुवात करणे काहीसे अवघड होत असल्याचे नासाने म्हटले आहे. फ्युस्टेलने प्रसिद्ध केलेला हा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, अनेकांनी फ्युस्टेल आणि त्याच्या सहकाऱ्याचे पृथ्वीवर सुखरूप परतल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून फ्युस्टेल आणि त्याच्या सहकाऱ्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Leave a Comment