देशभरातील केबल टीव्ही व्यावसायिकांचा उद्या तीन तासांसाठी ब्लॅक आऊट

trai
नवी दिल्ली : देशभरातील केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) दिले आहे. त्याचबरोबर काही जाचक अटी केबल टीव्ही व्यावसायिकांवर घातल्या असल्याचा आरोप करत गुरुवारी 27 डिसेंबर रोजी देशभरातील केबल व्यावसायिकांनी तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या (27 डिसेंबर) संध्याकाळी सात ते रात्री 10 या वेळेत केबल व्यावसायिक केबल सेवा बंद ठेवणार आहेत. या आंदोलनामुळे प्रेक्षक ‘प्राइम टाइम’मधील अनेक मालिकांना मुकणार आहेत. तसेच यासंदर्भात चर्चा करण्य़ासाठी केबल व्यावसायिकांची आज मुंबईत बैठक होणार आहे.

ट्रायच्या नव्या धोरणांवर केबल व्यावसायिकांनी आरोप केले आहेत की, ट्रायने नव्या धोरणातील नियम आखताना केबल, डीटीएच सेवा देणाऱ्या घटकांचे भविष्य अधांतरी ठेवले आहे. तसेच ग्राहकांच्या हिताचे नवे नियम नाहीत. केबल व्यावसायिक उद्या ट्रायच्या नव्या नियमांचा निषेध नोंदवण्यासाठी लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहिन्यांची निवड करता यावी यासाठी, ट्रायने सर्व अधिकृत वाहिन्यांचे दर निश्चित करायला लावले आहेत. नवे नियम २९ डिसेंबरपासून लागू करण्यासाठी ट्रायकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Comment