४ भूतांच्या चोरीचा न्यायालयात ३ महिने चालला खटला

ghost
पाटणा – आपण आजवर मौल्यवान वस्तू, जनावरे आणि दागिण्यांची किंवा पैशांची चोरी झाल्याची बातमी वाचली किंवा पाहिली असेल. पण बिहारच्या मुजफ्फरपूरमधील एका महिलेचे चक्क भूतच चोरी झाले होते. त्यामध्ये चक्क ४ भूतांचा समावेश होता. तिने त्यासाठी थेट न्यायालयात धाव घेतली होती आणि यावर न्यायालयात चक्क ३ महिने सुनावणीही झाली होती.

मुजफ्फरपूरमधील हथौडी गावच्या रहिवाशी जैलस देवी या महिलने शेजारणीवर तिचे ४ भूत चोरी केल्याचा आरोप लावला होता. तिने त्यासाठी न्यायालयात धाव घेतली आणि त्या शेजारणीच्या नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली. त्या दोन्ही कुटुंबीयांमध्ये यावरून मोठी हाणामारीही झाली होती. वाऱ्यासारखी ही बातमी आजुबाजूच्या परिसरामध्ये पसरल्यानंतर तिला पत्रकारांनी गाठले. माझ्या ४ भूतांना शेजारच्या व्यक्तीने चोरल्याचे तिने सांगितले.

तब्बल ३ महिने या प्रकरणावर न्यायालयात खटला चालला. त्यानंतर परस्पर सहमती करून दोन्ही कुटुंबीयांनी हा वाद सोडवला. तिने त्यानंतर सांगितले, की तिच्याकडे चोरी झालेले चारही भूते परत आले आहेत. तिने त्यासाठी सहमतीने वाद मिटवला आहे. ज्या व्यक्तीविरोधात खटला दाखल करण्यात आला, त्यांनी स्पष्ट केले, की तिने कोणत्याही भूताची चोरी केली नव्हती. उलट तिच्या सुनेनेच ते भूत लपवून ठेवले होते. या अंधश्रद्धेच्या घटनेमुळे न्यायपालिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. न्यायालयात आधीच अनेक खटले प्रलंबित असताना अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने वेळ घालवणे गंभीर असल्याचे बोलले जात आहे. एकप्रकारे न्यायालयदेखील अंधश्रद्धांना प्रोत्साहन देत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.