सोलापूरमध्ये चक्क एका कुत्रीचे डोहाळजेवण

dog
गर्भवती महिला आणि तिचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा डोहाळजेवण निमित्ताने करण्यात येतो. पण चक्क एका कुत्रीचे डोहाळजेवण सोलापूरमध्ये करण्यात आले. मुळेगाव येथील गणेश काकडे यांच्या अंबी या कुत्रीचे साग्रसंगीत डोहाळजेवण साजरे करण्यात आले. सोलापूरमधील सुमेध पेट क्लिनिकच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. सोशल मीडियावर या डोहाळजेवणाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आपल्या कुत्रीचे मालकाने अशाप्रकारे लाड केल्याने याची बरीच चर्चा रंगलेली दिसते. ज्याप्रमाणे गर्भवती महिलेला डोहाळजेवणाला हिरवी साडी-चोळी घेतली जाते त्याचप्रमाणे या कुत्रीला साडी नेसवण्यात आली होती. तिला फुलांचा हार आणि गजरा घालून सजवण्यात आले होते.
dog1
गोडाधोडाचे पदार्थ करुन डोहाळजेवणाला ज्याप्रमाणे ते मांडले जातात तसेच शेंगदाण्याची पोळी, ड्रायफूटस, धपाटे, भाकरी, फळे असे अनेक पदार्थ अंबी पुढेही मांडण्यात आले होते. महिलांनी तिचे औक्षण करुन ओटीही भरली. अंबीला हा सर्व प्रकार समजत नसला तरीही हे सगळे ती शांतपणे करवून घेत होती. या कार्यक्रमाचे आयोजन माजी पशुधन विकास अधिकारी डॉ. बबन कांबळे यांनी केले होते. कांबळे या कार्यक्रमाविषयी सांगताना म्हणाले, प्राणी ही आपल्याला मिळालेली एक अनमोल भेट आहे. कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे कुत्रा असतो. अंबी या रॉट व्हीलर जातीच्या कुत्रीचा गर्भधारणेपासून ५५ व्या दिवशी डोहाळजेवण समारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांसाठी जेवणाचेही आयोजन करण्यात आले होते. एकूणच सर्वांनी या जेवणाचा अतिशय उत्तम पद्धतीने आस्वाद घेतला.

Leave a Comment