आफ्रिकी ग्रे प्रजातीच्या एका पोपटाने ‘अलेक्सा’च्या मदतीने दिली आइस्क्रीमची ऑर्डर

parrot
तंत्रज्ञानात दररोज होत असलेल्या नाविण्यपूर्ण संशोधनामुळे मनुष्याच्या जीवनात अनेक आमुलाग्र बदल होत असून लोक अनेक वेळा व्हर्च्युअल असिस्टंटच्या मदतीने ऑनलाइन शॉपिंग करतानाही दिसतात. ही बाब आता मनुष्यासाठी सर्वसाधारण झाली आहे. पण या सेवेचा वापर जर पक्ष्यांनी केला तर ? पण ब्रिटनमध्ये हैराण करणारा असाच प्रसंग समोर आला आहे. व्हर्च्युअल असिस्टंटच्या मदतीने येथे आफ्रिकी ग्रे प्रजातीच्या एका पोपटाने आइस्क्रीमशिवाय फळे आणि भाज्यांची ऑर्डर दिली.

स्मार्ट स्पीकर अलेक्साच्या मदतीने ही खरेदी या पोपटाने केली. अॅमेझॉनवर त्याने आइस्क्रीमपासून टरबूज, सुका मेवा आणि ब्रोकलीचीही ऑर्डर दिली. त्याचबरोबर तर लाईट बल्ब आणि पतंगही मागवले. यासंदर्भातील वृत्त ‘डेली मेल’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार रोको असे या पोपटाचे नाव आहे. या आधी तो पोपट बर्कशायर येथील नॅशनल अॅनिमल वेल्फेअर ट्रस्टच्या अभयारण्यात वास्तव्यास होता.

मनुष्याचा आवाज आणि शब्दांची नक्कल करण्यात आफ्रिकी ग्रे प्रजातीचे पोपट तरबेज असतात. तो पोपट अभयारण्यातील असुविधेमुळे एका कर्मचाऱ्याबरोबर राहत होता. नेहमी अलेक्साच्या मदतीने तो आपले आवडते गाणे ऐकत असत आणि एक दिवस त्याने त्याच्या मदतीने सामानही मागवले.

Leave a Comment