जेनेलिया डिसूजाप्रमाणे तुम्हीही घरच्याघरीच लाऊ शकता औषधी वनस्पती

herbal
अभिनेता रितेश देशमुख याच्याशी विवाह झाल्यानंतर आणि आता दोन अपत्यांसह संसारामध्ये संपूर्णपणे गुरफटून गेल्यानंतर अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हीने अभिनय क्षेत्रातून तात्पुरती निवृत्ती घेतली आहे. जेनेलिया आता अभावानेच मोठ्या पडद्यावर दृष्टीस पडत असली, तरी तिच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मात्र ती अतिशय व्यस्त असते. मुलांच्या संगोपनाच्या जोडीनेच सध्या जेनेलियाने घरच्याघरी जैविक पद्धतीने औषधी वनस्पती लावण्यास सुरुवात केली असून, याबद्दलची पोस्ट तिने नुकतीच सोशल मिडीयावर शेअर केली आहे. घरच्याघरी जैविक पद्धतीने औषधी वनस्पती लावणे कोणालाही शक्य असून, या द्वारे संपूर्णपणे नैसर्गिक आणि कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर न करता उगविलेल्या या वनस्पती आरोग्यासाठी वरदान ठरत असल्याचे जेनेलिया म्हणते. त्यामुळे जेनेलिया प्रमाणे आपणही घरच्या घरी थोड्याफार प्रमाणामध्ये जैविक पद्धतीने औषधी वनस्पती लावण्याचा विचार नक्कीच करू शकतो. लहान-मोठ्या आरोग्याच्या तक्रारींवर या वनस्पती नक्कीच गुणकारी ठरतील.
herbal1
घरच्याघरी औषधी वनस्पती लावताना उपलब्ध असणारी जागा हा सर्वात मोठा आणि मूलभूत प्रश्न असतो. सर्व प्रकारच्या वनस्पती लावण्यासाठी आवश्यक जागा, पाणी, सूर्यप्रकाश या सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतीलच असे नाही. त्यातून फ्लॅटस् मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर केवळ त्यांच्या घरांच्या बाल्कनीमध्ये असलेली जागाच तेवढी उपलब्ध असते. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असणारी जागा पाहून त्यानुसार कोणत्या वनस्पती लावता येऊ शकतील याचा विचार करणे अगत्याचे ठरते. त्यातूनही अगदी सहज, लहान कुंड्यांमध्ये लावल्या जाऊ शकणाऱ्या अनेक वनस्पती लावता येऊ शकतील. यामध्ये आपल्याला नेहमी लागणाऱ्या काही सर्वसामान्य औषधी वनस्पती समाविष्ट करता येतील.
herbal2
चहा, चटणी, अन इतर अनेक पदार्थांमध्ये वापरता येणारा पुदिना लहानशा कुंडीमध्ये देखील लावता येऊ शकतो. पुदिना हा केवळ पदार्थाची चव वाढविणाराच नाही, तर पचनाशी निगडित समस्या दूर करणारी औषधी देखील आहे. पुदिन्याच्या सेवनाने मळमळ, पित्त, यांसारख्या व्याधींमध्ये आराम मिळत असून, शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत असून, याच्या सेवनाने लिव्हर बळकट होते. पुदिन्याच्या जोडीनेच गवती चहा ही कुंडीमध्ये लावता येऊ शकतो. अतिशय सुगंधी असलेली ही वनस्पती डासांचा नायनाट करण्याच्या कामीही येऊ शकते. नेहमीच्या चहाच्या सोबतीने गवती चहाची पाती उकळून घेऊन त्याचे सेवन केल्याने शरीराला अतिशय फायदेशीर अशी अँटी-ऑक्सिडंटस् आपल्याला मिळतात. याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहत असून, याने शरीराची चयापचय शक्ती चांगली राहते.
herbal3
बहुतेक सर्वच घरांमध्ये हमखास आढळणारी तुळस देखील कुंडीमध्ये सहज लावली जाऊ शकते. घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार करणारी ही औषधी आहे. शरीरातील घातक जीवाणूंचा नाश करून इन्फेक्शन रोखणारी अशी ही औषधी आहे. तसेच तुळस हार्मोन्सचे संतुलन राखत मधुमेह दूर करणारी असून, के जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहे. दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळशीचे सेवन उत्तम आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment