अनेक सेलिब्रिटींचा, नामवंत व्यक्तींचा विवाहसोहळा या वर्षभरात पार पडला. पण बऱ्याच कारणांसाठी सर्वांच्या लक्षात वर्षाअखेर संपन्न झालेला एक विवाहसोहळा राहणार आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये बुधवारी (१२ डिसेंबर) रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींची कन्या इशा अंबानीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. अंबानी कुटुंबातील लग्न म्हटल्यावर येथे राजेशाही थाट असणारच. मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्सने नटलेला इशाचा संगीत सोहळा अनेकार्थी लक्षवेधी ठरला. प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी सलमान, शाहरुख, आमिर, ऐश्वर्या, अभिषेक यांसोबतच हिलरी क्लिंटन आणि बेयॉन्से यांसारखे जागतिक स्तरावरील नामवंत व्यक्तीसुद्धा हजर होते. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा झाली.
इशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये थिरकल्या चक्क हिलरी क्लिंटन!
संगीत सेरेमनी किंग खान शाहरूख व करण जोहरने होस्ट केली. इशा व आनंद या संगीत सेरेमनीत रोमॅन्टिक डान्स करताना दिसले. यावेळी अंबानी कुटुंबानेही डान्स केला. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या रोमॅन्टिक गाण्यावर मुकेश अंबानी व नीता अंबानी हेही थिरकले. याचदरम्यान अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांनी देखील या कार्यक्रमात ठेका धरला. त्या ‘तुने मारी एंट्री यार’ या गाण्यावर थिरकताना दिसल्या.
त्यानंतर रात्री सहभागी झालेल्या पाहुण्यांसाठी खास कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कॉर्निव्हलचे आकर्षण ठरली ती म्हणजे अमेरिकन पॉप स्टार बेयॉन्से. अंबानी कुटुंबाने या कॉनिर्व्हलमध्ये बेयॉन्सेच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल १२ कोटी रूपये मोजले आहेत. शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन असे अनेक बडे स्टार या कॉर्निव्हलमध्ये स्टेजवर थिरकले. शाहरूखने गौरीसोबत तर ऐश्वर्याने अभिषेकसोबत रोमॅण्टिक डान्स केला.