राजधानी दिल्लीचे प्रदूषण कमी करणार महाकाय एअर प्युरीफायर !

air
भारतामध्ये सर्वच मोठ्या शहरांमध्ये वाढत्या जनसंख्येबरोबर हवेचे प्रदूषणही वाढत आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे तर प्रदूषणाने धोक्याची पातळी केव्हाच मागे सारली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनरोग, त्वचारोग. निरनिराळ्या अॅलर्जी, डोळ्याचे रोगही जास्त पहावयास मिळत आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि वाढत जाणारे औद्योगिकरण हे प्रदुषणासाठी कारणीभूत ठरत आहेत. तसेच राजधानीच्या लगत असलेल्या राज्यांमध्ये पिकांच्या कापणीनंतर शेते जाळण्याच्या पद्धतीमुळे हे प्रदूषण आणखीनच वाढीला लागले आहे. याचे प्रमाण कमी करण्याकरिता जनजागृती करण्याचे काम राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने केले जात असते. पण याचा फारसा उपयोग होताना पहावयास मिळत नाही.
air1
चीन देशामध्ये प्रदूषणामुळे दुषित होत असलेली हवा शुद्ध करण्यासाठी शियान या ठिकाणी शंभर मीटर उंचीचा महाकाय एअर प्युरीफायर बसविण्यात आला असून, त्यामुळे हवेतील प्रदुषण मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले आहे. हीच कल्पना अंमलात आणून भारताची राजधानी दिल्ली येथेही अश्याच प्रकारचा महाकाय एअर प्युरीफायर बसविण्यात येण्याची शक्यता सध्या विचारामध्ये घेतली जात असल्याचे समजते. हवेच्या शुद्धीकरणासाठी प्युरीफायर्स बनविण्यात हातखंडा असलेली कंपनी कुरीन सिस्टम्स यांच्या तर्फे हा महाकाय एअर प्युरीफायर बनविण्याची कल्पना मांडण्यात आली आहे.
air2
या कंपनीने सध्या बनविलेला एअर प्युरीफायर चाळीस फुट उंचीचा असून, त्याची रुंदी वीस फुटांची आहे. ३२ मिलियन क्युबिक मीटर्स हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया या प्युरीफायरच्या माध्यमातून होऊ शकणार असून, ज्या भागामध्ये हा प्युरीफायर बसविण्यात येईल, तेथे राहणाऱ्या सुमारे ७५,००० लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या प्युरीफायरमध्ये नऊ फिल्टर्स असून, त्यामध्ये अनेक पंखे आणि इतर लहान मोठे फिल्टर्स असणार आहेत, त्यामुळे यांची व्यवस्थित निगा राखली जाणेही आवश्यक असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. हे एअर प्युरीफायर बसविण्यात येण्याबद्दल सध्या राज्य आणि केंद्र सरकारशी चर्चा सुरु असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणे अपेक्षित आहे.

Leave a Comment