अहमदनगर – फक्त आपल्या तालुक्यापुरतेच विखे-थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी कार्य केले. त्यांनी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहमदनगरकडे कधीच लक्ष दिले नाही. नगरला त्यांनी अक्षरशः वाळीत टाकले, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. फडणवीस महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करताना बोलत होते.
विखे-थोरातांनी अहमदनगरकडे कधीच लक्ष दिले नाही – देवेंद्र फडणवीस
नगरच्या महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात नसतानाही अनेक योजनांसाठी कोट्यवधी रुपये दिले. पण आधीच्या पक्षाच्या हातात १५ वर्षांची अनिर्बंध सत्ता होती. पण सतत शहराकडे त्यांनी दुर्लक्ष केले. महापालिकेची सत्ता आता आल्यास भाजप काय करू शकतो? याचा जनतेने विचार करावा, असेही ते यावेळी म्हणाले. केवळ भाजपच शहराचा विकास करू शकतो, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. शिवाय काँग्रेसच्या १५ वर्षे कारभाराचा आणि भाजपच्या ४ वर्षाच्या कारभाराचा हिंमत असेल तर एका व्यासपीठावर लेखाजोखा होऊ द्या, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अखेर थांबली असून जाहीर प्रचार करण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपने थेट मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरवून शक्तिप्रदर्शन करत जाहीर प्रचाराची सांगता केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, संपर्क नेते आमदार सुरजितसिंग ठाकूर, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते.