पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात रोहित शर्माचे पुनरागमन

rohit-sharma
अॅडलेड : गुरूवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम १२ खेळाडूंची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली आहे. भारताने अॅडलेड येथे होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्माच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. पण, नक्की तो कोणत्या क्रमवारीत फलंदाजीला येईल हे उद्याच स्पष्ट होईल. पृथ्वी शॉ दुखापत ग्रस्त झाल्यामुळे लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंची नावे ऑस्ट्रेलियानेही जाहिर केली आहेत.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत मुंबईकर रोहितला स्थान देण्यात आले नव्हते. पण मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितने दमदार कामगिरी केल्यामुळे त्याची कसोटी संघातील दावेदारी मजबूत झाली आहे. त्यात लोकेश राहुलचा फॉर्म हा संघासाठी चिंतेची बाब बनला असल्यामुळे रोहित आणि मुरली विजय ही सलामीची जोडी पहिल्या कसोटीत पाहायला मिळेल. सलामीच्या जोडीत प्रयोग न करण्याचा निर्णय झाल्यास हनुमा विहारी आणि रोहित यांच्यापैकी एकाला अंतिम अकरामध्ये संधी दिली जाऊ शकते. गोलंदाजीत मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर धुरा असेल. आर. अश्विनवर फिरकीची मदार असणार आहे.

भारतीय संघ : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा.

ऑस्ट्रेलिया संघ : मार्कस हॅरिस, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

Leave a Comment