सोलापूरमधील ४१ शाळांचा नपुंसकत्वाच्या भीतीपोटी गोवर-रुबेला लस घेण्यास नकार

vaccination
सोलापूर – आरोग्य विभागाकडून २७ नोव्हेंबरपासून राज्यभर गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. ही लस राज्यभरातील सर्व शाळा आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. ही लस नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांना दयावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनीही केले होते. पण या लसीबाबत आता अचानक गैरसमज निर्माण झाल्याने ही लस आपण आपल्या शाळेतील मुलांना देणार नसल्याचे सोलापूरमधील ४१ शाळांनी सांगितले आहे. ही लस घेतल्याने नपुंसकत्व येते अशी चुकीची माहिती पसरली असल्यामुळे आपल्या शाळेतील मुलांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये या भितीने शाळांनी लस घेण्यास नकार दिला आहे.

मराठी तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा या शाळांमध्ये समावेश असून आयुक्त त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सोलापूरचे आयुक्त या लसीच्या संदर्भात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत तातडीची बैठक घेणार आहेत. यावर बैठकीच्या माध्यमातून योग्य तो तोडगा काढला जाणार आहे. ही लस देणे धोकादायक असल्याच्या व्हिडिओ क्लीप २ दिवसांपूर्वीपासून सोशलमीडियावर व्हायरल होत होत्या. पालकांमध्ये त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पण प्रशासनाकडून त्याही खोट्या असल्याचे सांगण्यात आले. या घटनांमुळे या लसीकरण मोहिमेला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत याविषयी स्पष्टीकरण देताना म्हणाले, गोवर-रुबेला ही लस धोकादायक नसल्यामुळे पालकांनी अजिबात काळजी करु नये. आपली मुले ही आमची मुले आहेत, गोवर आणि रुबेलासारख्या गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून ९ महिने ते १५ वर्षे वयाच्या मुलांना ही लस द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. माझ्या नातवंडांना मी देखील ही लस देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे बालकांच्या आरोग्याला कोणताही धोका नसून पालकांनी मनात कोणतीही शंका न ठेवता आपल्या बालकाला लस द्यावी असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.

Leave a Comment