बीड : कथित व्हिडिओतील संभाषणामुळे वादात सापडलेल्या माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची बदली औरंगाबादला करण्यात आली असून येथील पदभार गेवराईचे अर्जुन भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, त्यांची चौकशी अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
वादग्रस्त पोलिस अधिकारी नवटके यांची औरंगाबादला बदली
सध्या आयपीएस असलेल्या भाग्यश्री नवटके यांचा परिविक्षाधिन कालावधी सुरू असून वर्षभरापूर्वी त्यांनी माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार घेण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून काम केले. त्यांनी माजलगावचा पदभार घेतल्यानंतर या भागातील अवैध धंद्यांवर वचक बसविण्याबरोबर अवैध वाळू उपशाविरोधातही जोरदार मोहीम राबविली. त्यांनी समाजविघातक शक्तींना काबूत आणले; पण त्यांच्या संभाषणाचा कथित व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यातील वादग्रस्त संभाषणामुळे रविवारी (ता. दोन) त्यांची चौकशी लावण्यात आली होती. तर, सोमवारी त्यांच्याविरोधात विविध संघटनांनी जिल्ह्यात आंदोलने करून त्यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. दरम्यान, त्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आली.