धनगर समाजाचा एल्गार; सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी आरक्षण न दिल्यास घरी बसविणार

dhangar
बीड – धनगर समाजाला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वी आरक्षण मिळाले नाही, तर सत्ताधा-यांना आम्ही घरी बसविल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांनी दिला आहे. एस. टी. प्रवर्गात राज्यातील धनगर समाजाचा समावेश करा, ही मागणी आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत. पण आमच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आले आहे, म्हणून हा निर्णय आम्ही घेतला असल्याचेही ते म्हणाले.

ते जिल्ह्यातील माजलगाव येथे आयोजित धनगर एल्गार मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माधव निर्मळ, कल्याण आबूज, भागवत सरवदे आदींची उपस्थित होते. यावेळी बोलताना गोपिचंद पडळकर म्हणाले, की धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन २०१४च्या निवडणुकांवेळी या सरकारने दिले होते. मात्र, ते आरक्षणाबाबत ४ वर्षानंतरही काहीच बोलत नाही. धनगर समाजाला भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक डावलले जात आहे. मंत्री, आमदारदेखील धनगर समाजातील आहेत, तरीही आरक्षण मिळत नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. आमच्या आरक्षणावर जे सरकार बोलत नाही, आमच्या हिताचा निर्णय घेत नाही, त्या सरकारला आम्ही २०१९मध्ये सत्तेत येऊ देणार नाही, असेही गोपिचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

धनगर समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात राज्यातील अनेक मतदार संघात आहे. कोणाला निवडणून आणायचे, हे धनगर समाज ठरवतो. मात्र, यावेळी बहुतांश मतदार संघात धनगर समाजाचे कार्यकर्ते निवडणूक लढविताना दिसतील, असे धनगर समाजनेते उत्तमराव जानकर यांनी सांगितले.

Leave a Comment