तुम्ही कॉफी-प्रेमी आहात? मग जाणून घ्या कॉफीविषयी काही रोचक तथ्ये

coffee
कॉफी हे जगातील लाखो लोकांचे आवडते पेय आहे. एकट्या अमेरिका देशामधेच चारशे मिलियन कप कॉफीचे सेवन दर दिवशी केले जात असल्याने जगातील सर्वात जास्त कॉफीची मागणी असणारा अमेरिका हा प्रमुख देश आहे. कॉफीचा इतिहास खरेतर १६७१ सालापासूनचा आहे, पण या जगभरातील लोकप्रिय पेयाबद्दलची फारशी माहिती आपल्याला नाही. या पेयाविषयी काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.
coffee1
आठव्या शतकामध्ये इथियोपियातील एका मेंढपाळाला, इथियोपिया येथील पठारांवर कॉफीचे रोप पहिल्यांदा सापडले असल्याचे म्हणण्यात येते. कालदी नामक मेंढपाळाला हे रोप प्रथम सापडल्याचे सांगितले जाते. मेढ्यांना चरण्यास नेल्यानंतर एका विशिष्ट झाडाची फळे त्या खात असलेले, या मेंढपाळाने पहिले होते. या झाडाची फळे खाल्ल्यानंतर मेंढ्यांमध्ये उत्साह येत असून, त्या रात्री देखील जाग्या राहत असल्याचे कालदीच्या लक्षात आले. याचे रहस्य नेमके काय असावे हे शोधण्याच्या प्रयत्नात कालदी आणि त्याच्या मित्राने या फळांचा वापर करून एक पेय तयार करून त्याचे सेवन केले. या पेयाचे सेवन केल्यानंतर शरीरातील आळस, थकवा जाऊन शरीरामध्ये चैतन्य येत असल्याचा अनुभव त्यांना आला. आपला अनुभव त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना कथन केल्यानंतर या फळांपासून तयार केलेल्या पेयाचे सेवन लोकप्रिय होऊ लागले आणि अश्यारीतीने कॉफीचा जन्म झाला.
coffee2
फिनलंड या देशामध्ये कॉफीचे सेवन सर्वाधिक असून, अमेरिकेमध्ये इतर शहरांच्या मानाने न्यूयॉर्क येथे कॉफीचे सेवन सर्वाधिक आहे. अमेरिकेमध्ये सर्वसामान्य नागरिक साधारणपणे वीस डॉलर्स इतकी रक्कम दर आठवड्याला केवळ कॉफीसाठी खर्च करीत असतात. एका सर्वेक्षणानुसार अठरा ते पस्तीस वयोगटातील अमेरिकन नागरिक वर्षाला १,०२९ इतकी रक्कम कॉफीसाठी खर्च करीत असतात.
coffee3
जगामध्ये कॉफीच्या केल्या जाणाऱ्या एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के उत्पादन ब्राझील देशामध्ये केले जाते. कॉफीच्या उत्पादनासाठी आवश्यक हवामान ब्राझील देशामध्ये असल्याने या देशामध्ये कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. ब्राझील पाठोपाठ व्हियेतनाम, कोलंबिया, इंडोनेशिया, आणि होन्डुरास या देशांमध्ये कॉफीचे उत्पादन सर्वाधिक आहे. कॉफीच्या सेवनाने मानसिक नैराश्याचे प्रमाण कमी होत असल्याचे निदान वैज्ञानिकांनी २०१५ साली केलेल्या रिसर्चद्वारे केले आहे. तसेच केवळ कॉफीच्या केवळ सुगंधाने मनाची मरगळ निघून जाऊन मन प्रफुल्लीत होत असल्याचे ही या शोधामध्ये म्हटले आहे.

Leave a Comment