जाणून घेऊ या काही रोचक तथ्ये

fact
या जगामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी दररोज आपल्यासमोर येत असतात. तसेच अनेक गोष्टींशी निगडीत तथ्ये देखील आपल्यासमोर येत असतात. अशीच काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या. या जगामध्ये लोकांच्या वर्णामध्ये जशी विविधता आहे, तशी लोकांच्या केसांच्या रंगांमध्येही विविधता आहे. काहींचे केस काळे, काहींचे भुरे, काहींचे सोनेरी तर काहींचे केस चक्क लालसरही असतात. लालसर केस असणाऱ्यांना ‘रेड हेड्स’ म्हटले जाते. या रेड हेड्सच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असे, की यांच्यावर कधी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आलीच, तर इतरांच्या मानाने वीस टक्के जास्त अनास्थेशिया यांना द्यावा लागतो. तसेच इतरांच्या मानाने यांना वेदनाही जास्त होतात. रेड हेड्स मध्ये असलेला ‘मेलानोकोर्टिन -१’ रीसेप्टर जीन यासाठी कारणीभूत असल्याचे वैज्ञानिक संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे.
fact1
इलेक्ट्रिक कारचा शोध एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी लागला. फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ गॅस्टॉन प्लान्ते याने रिचार्ज करता येण्याजोग्या बॅटरीज् चा शोध लावल्याने इलेक्ट्रिक कार तयार करण्याचे काम आणखीनच सोपे झाले. १८६७ साली ऑस्ट्रियन शोधकर्ता फ्रांझ क्रवोल याने पॅरीसमध्ये जगातील सर्वात पहिली इलेक्ट्रिक दुचाकी सादर केली. त्यानंतर ब्रिटीश शास्त्रज्ञ थॉमस पार्कर यांनी सुधारित रिचार्जेबल बॅटरीचा वापर करून जगातील सर्व प्रथम इलेक्ट्रिक कार तयार केली. फ्रांस, जर्मनी आणि युनायटेड किंग्डम ही इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणावर तयार करणारी पहिली राष्ट्रे होती.
fact2
समुद्रामध्ये अनेक तऱ्हेचे जलचर अस्तित्वात आहेत. यामध्ये एक अजब जलचर आहे ‘लायन्स मेन’, म्हणजे एखाद्या सिंहाच्या आयाळीप्रमाणे दिसणारा जेली फिश. या जलचराची लांबी तीस मीटर पर्यंत वाढू शकते. आजवर अश्या प्रकारच्या जेली फिश मध्ये ३७ मीटर लांबीचा जेलीफिश सर्वात जास्त लांबीचा मानला गेला आहे. ही लांबी ब्ल्यू व्हेल जातीच्या माश्यापेक्षाही अधिक आहे. या प्रजातीचे जेलीफिश मुख्यत्वे अटलांटिक, आणि उत्तरी प्रशांत महासागरामध्ये आढळून आले आहेत.

Leave a Comment