एके काळी लोकप्रिय असलेले ‘meme’ स्टार्स साधा आहेत तरी कुठे?

meme
आजकाल एखादे छायाचित्र सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले की त्या छायाचित्राचे वर्णन करण्याऱ्या काही धमाल प्रतिक्रिया व्यक्त होतात आणि त्या लोकप्रियही होतात. याच प्रतिक्रियांना इंग्रजी भाषेमध्ये meme म्हटले गेले आहे. या छायाचित्रांची गमतीदार वर्णने, किंवा त्यांच्या तोंडी घालण्यात आलेले काल्पनिक संभाषण यांमुळे ही छायाचित्र दीर्घ काळ लोकांच्या लक्षात राहतात. असेच काही meme जगभरामध्ये गाजले. या memeमध्ये ज्यांची छायाचित्रे आहेत, त्यांना त्या काळी या मीम मुळे अपार प्रसिद्धी ही मिळाली. पण कालांतराने जसे या memes ची प्रसिद्धी ओसरली, तसे हे मीम स्टार्स देखील काळाच्या ओघामध्ये लुप्त झाले. असे हे मीम स्टार्स आजच्या काळामध्ये नक्की आहेत तरी कुठे, आणि सध्या त्यांचे जीवन कसे आहे, हे जाणून घेऊ या.

‘disaster girl’ या नावाने प्रसिद्ध झालेले मीम आता तेरा वर्षे जुने झाले असले, तरी त्याकाळी या मीमला खूप प्रसिद्धी मिळाली होती. २००४ साली डेव्ह रॉथ नामक व्यक्तीने भीषण आगीमध्ये भस्मसात होणाऱ्या एका घराचे छायाचित्र खेचले असता, या छायाचित्रामध्ये डेव्हची मुलगी झोई विचित्र, गूढ स्मित करताना दिसते. हे छायाचित्र डेव्हने सोशल मिडीयावर अपलोड केले, आणि त्यामध्ये विचित्रपणे स्मित करणारी झोई ही लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. तेव्हापासून एखाद्या भीषण घटनेचे छायाचित्र प्रसिद्ध होताना त्यामध्ये गूढ, विचित्र स्मित करणाऱ्या झोईचे छायाचित्र ‘फोटोशॉप’च्या द्वारे लावले जाऊ लागले. सध्या झोई उच्च माध्यमिक शिक्षण घेत असून, मँडरीन भाषेचा अभ्यास करीत आहे. तसेच गणित विषयामध्येही तिने विशेष प्राविण्य मिळविले आहे.

काईली क्रॅव्हन याचे छायाचित्र त्याच्या मित्राने सोशल मिडीयावर प्रसिद्ध करताच हे छायाचित्र लोकप्रिय होऊन काईली ला ‘बॅड लक ब्रायन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. २०१२ साली हे छायाचित्र इंटरनेट मीम म्हणून अमेरिकेमध्ये खूपच लोकप्रिय होते. या मीम ला कारणीभूत ठरला क्रॅव्हनचा त्याच्या मित्राने घेतलेला एक अतिशय मजेशीर फोटो. या छायाचित्राला इतकी प्रसिद्धी मिळाली, की खेळणी, स्टीकर, आणि टी शर्टसवरही हे छायाचित्र दृष्टीस पडू लागले. त्यानंतर ‘बॅड लक ब्रायन’ या पात्राच्या भूमिका देखील काईलीने काही शो मध्ये केल्या. सध्या काईली आपल्या वडिलांचा बांधकाम व्यवसाय सांभाळीत आहे.

‘स्कमबॅग स्टीव्ह’ ही मीम इंटरनेटवर २००६ साली प्रसिद्ध झाली होती. यामध्ये तेव्हा सोळा वर्षांचे वय असलेल्या ब्लेक बोस्टन नामक तरुणाचे उलटी टोपी आणि कोट घातलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर एखादी धमाल ‘पंचलाईन’ टाकण्यासाठी या छायाचित्राचा वापर केला जाऊ लागला होता. हे मूळ छायाचित्र ब्लेकच्या आईने खेचलेले होते. त्यानंतर काही काळ ब्लेक ‘रॅप’ संगीतकार म्हणून कार्यरत होता. त्या वेळी त्याने म्हटलेले ‘स्कमबॅग स्टीव्ह’ याच नावाचे ‘रॅप’ गाणेही लोकप्रिय ठरले होते.

अलीकडच्या काळामध्ये जगभर अतिशय गाजलेले छायाचित्र आहे ‘सक्सेस किड’ सॅमी ग्राइनर याचे. हाताची मूठ आवळून, एखादी मोठी कामगिरी फत्ते केल्याचा आविर्भाव या छायाचित्रातील केवळ अकरा महिने वयाच्या छोट्या सॅमीच्या चेहऱ्यावर आहे. २००७ साली हे छायाचित्र सोशल मिडीयावर आले, आणि याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तेव्हापासून कोणत्याही गोष्टीमध्ये मिळालेल्या यशाचे वर्णन करण्यासाठी या ‘सक्सेस किड’ च्या छायाचित्राच्या मीमचा वापर करण्यात येतो. हे छायाचित्र इतके लोकप्रिय झाले, की जाहिरातींमध्ये वापरण्यात येण्यासाठी देखील याला खास परवाना देण्यात आला. केवळ सोशल मिडीयावरच नव्हे, तर सॅमीच्या छायाचित्राचा वापर ‘व्हाईट हाऊस’ने देखील केला आहे. २०१५ साली सॅमी च्या मातापित्यांनी सॅमीच्या लहानपणीच्या या छायाचित्राचा वापर त्याच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी निधी गोळा करण्यासाठी केला. या निधीद्वारे सॅमीच्या वडिलांची यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सॅमी बारा वर्षांचा असून, शालेय शिक्षण घेत आहे.

Leave a Comment