या नियमांचे किम जोंग उनच्या पत्नीला करावे लागते पालन

kim-jong
किम जोंग उन हे उत्तर कोरियाचे सत्ताधीश आहेत. गेल्या तीन पिढ्या उत्तर कोरियावर किम जोंग उन यांच्या वंशजांची सत्ता चालत आली आहे. संपूर्ण देशाची सत्ता हाती असणाऱ्या या बलाढ्य सत्ताधीशाच्या अंमलाखाली राहणाऱ्या जनतेला कठोर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांना खुद्द किम जोंगची पत्नी देखील अपवाद ठरू शकत नाही. किम जोंग उनची पत्नी री सोल-जू हिचे व्यक्तिमत्व लोकांच्या परिचयाचे असले, तरी तिच्याबद्दल फारशी विस्तारपूर्वक माहिती कोणाला नाही. किम जोन उनने आपल्या पत्नीवर लावलेले नियम, यासाठी कारणीभूत आहेत.
kim-jong1
री सोल-जू, किम जोंग उनसोबत मोजक्याच सामाजिक कार्यक्रमांना हेजेरी लावीत असली, तरी इतर राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांच्या पत्नीप्रमाणे एकटीनेच कोणत्याही कार्यक्रमाला किंवा एरव्हीही एकटीने कुठे बाहेर पडण्याची मुभा तिला नाही. किम जोंग उनशी विवाह होण्यापूर्वी तिचे आयुष्य कसे होते, याचीही माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इतक्या बलाढ्य सत्ताधीशाची पत्नी नेमकी आहे तरी कशी, हे जनतेसाठी आजवर न उकललेले गूढ आहे. ‘री सोल-जू’ हे किम जोंग उनच्या पत्नीचे मूळचे नाव नाही. विवाहानंतर री सोल-जूला आपले संपूर्ण नाव बदलावे लागले होते, जेणेकरून तिच्या पूर्वायुष्याशी निगडीत कोणतीही माहिती उघड होऊ नये. याच कारणास्तव री सोल-जूच्या मातापित्यांची ओळख देखील गुप्त ठेवण्यात आली असून, त्यांना भेटण्यास जाण्याची मुभा री सोल-जू ला नाही. विवाहानंतर री सोल-जू गर्भवती असताना या बद्दल कुठेही वाच्यता करण्याची मुभा देखील तिला नव्हती. इतकेच काय, तर ती गर्भवती असताना घराबाहेर पडण्याची मुभाही तिला नव्हती. विवाहापश्चात तिने कोणत्या प्रकारची वेशभूषा करावी, किंवा कोणत्या प्रकारची केशभूषा करावी याबद्दलही नियम ठरवून देण्यात आले आहेत.

री सोल-जू बरोबरच तिच्या अपत्यांना देखील एकट्याने बाहेर पडण्याची मुभा नाही. या दाम्पत्याला तीन अपत्ये असून, यांच्या बद्दल फारशी माहिती प्रसिद्ध केली जात नाही. या अपत्याला दोन मुली असून, अलीकडेच त्यांना पुत्ररत्न लाभले आहे. बहुतेक वेळी सामाजिक कार्यक्रमांसाठी किम जोंग उन त्याच्या पत्नीच्या ऐवजी त्याच्या बहिणीसोबत हजेरी लावीत असतो. तसेच त्याचे सल्लागारही नेहमी त्याच्यासोबत असतात. किंबहुना किम जोंग उन आणि री सोल-जू चा विवाह देखील किम जोंग उनच्या वडिलांच्या आग्रहाखातर झाला होता. यामध्ये री सोल-जू चे मत जाणून न घेताच या दाम्पत्याचा विवाह घाईनेच उरकण्यात आला होता. विवाहानंतर देश सोडून बाहेर पडण्याची परवानगी री सोल-जू ला नाही.

Leave a Comment