ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ४६ कोटी ३० लाखांपर्यंत पोहचली

नवी दिल्ली – ब्रॉडबँड ग्राहकांसंदर्भात केंद्रीय दूरसंचार खात्याकडून माहिती जाहीर करण्यात आली असून जाहिर केलेल्या या माहितीनुसार, ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या चालू वर्षाच्या ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत ४६ कोटी ३० लाखांपर्यंत पोहचली असून जुलै ते ऑगस्ट या एका महिन्यात ग्राहक संख्येत ०.७४ टक्क्यांची वाढ झाल्याचेही दूरसंचार खात्याकडून सांगण्यात आले.

मोठ्या प्रमाणात टेलिफोन ग्राहकांच्या एकूण संख्येत वाढ झाली असून थेट जोडणी (वायर कनेक्शन) वापरकर्त्यांच्या संख्येत कुठलीही वाढ झाली नाही. वायरलेस वापरकर्त्यांच्या संख्येत ०.८४ टक्क्यांची वाढ झाली आहे. विभागनिहाय आकडेवारींचा विचार केला असता, मुंबई शहराचा यात सर्वात वरचा क्रमांक आहे. त्यानंतर बिहार आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. जम्मू-काश्मीर राज्याचा याबाबतीत सर्वात शेवटचा क्रमांक लागतो. एका महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये टेलिफोन ग्राहकांची संख्या १ लाख ७२ हजार ४४५ ने कमी झाली.

ग्राहक संख्येच्या एकूण वाढीचा विचार केला असता, वायरलेस प्रकारच्या जोडणीचा ९८.१३ टक्के वाटा आहे. थेट जोडणीचा (वायर कनेक्शन्स) अवघा १.८७ टक्के इतका वाटा आहे. उपलब्ध माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक टेलिफोन जोडणीची घनता आहे. महानगरीय ग्राहक संख्येच्या घनतेमध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई ही शहरे वरच्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment