महसूलमंत्र्यांचे विठुरायाला साकडे; मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे !

chandrakant-patil
सोलापूर – आज पहाटे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा पार पडली. यावेळी शासकीय पूजेचा मान दर्शन रांगेमधील कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी बाळासाहेब मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेंगाणे यांना मिळाला.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी न्यायालयात मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकू दे आणि दुष्काळी जनतेसाठी मोठा पाऊस पडू दे, ज्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटेल, असे साकडे पांडुरंगाला घातले. जवळपास ६ लाखापेक्षा जास्त वारकरी कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. पहाटे साडेतीनपासून शासकीय महापूजेनंतर सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झाली.

पाटील म्हणाले, मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागील आषाढी यात्रेला पूजा करण्यास विरोध करण्यात आला होता. आमच्या सगळ्यांच्याच मनात याची सल होती आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीपूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले आहे. अनेक आयोग आजवर ७० वर्षात आले. पण कोणीच मराठा समाजाला मागास ठरवले नव्हते, पण या सर्व अडचणींचा आम्ही अभ्यास करुन मागास आयोगापुढे कागदपत्रे सादर केल्याने पहिल्यांदाच मराठा समाजाला मागास ठरवण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment